मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शेकोटी पेटवण्यासह कचरा जाळण्यास महापालिकेने घातलेली बंदी मुंबईकरांनी उधळून लावली आहे. बंदी असूनही मुंबई शहर व उपनगरात खुलेआम कचरा जाळला जात असल्याचे नोव्हेंबरपासून 10 फेब्रुवारीपर्यंत प्रदूषणासंदर्भात आलेल्या तक्रारींवरून स्पष्ट झाले आहे. या काळात महापालिकेकडे आलेल्या 142 पैकी 111 तक्रारी कचरा जाळण्यासंदर्भातील होत्या. ( Pollution )
संबंधित बातम्या
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पालिकेने शहरात शेकोटी पेटवण्यासह कचरा जाण्यासबंदी घातली आहे. याचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. नोव्हेंबर ते 10 फेब्रुवारीपर्यंत 61,900 रुपये दंड वसूल करण्यात आला.
कचरा जाळण्याच्या प्रकारांना लगाम घालण्यासाठी पालिकेच्या 24 विभाग कार्यालयात टीम तैनात करण्यात आली आहे. तरीही कचरा जाळण्याच्या घटना सुरूच असल्याचे प्राप्त तक्रारींवरून स्पष्ट होते.
मानखुर्द आघाडीवर
पालिकेच्या मानखुर्द एम-पूर्व विभागात सर्वाधिक कचरा जाळण्याचे प्रकार घडत आहेत. 111 पैकी 32 तक्रारी मानखुर्द, बैंगनवाडी, शिवाजीनगर, गोवंडी आदी भागातून पालिकेला प्राप्त झाल्या. शहरातील धारावी, वरळी, सायन, अँटॉप हिल आदीसह पश्चिम उपनगरातील बांद्रा, जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर तर पूर्व उपनगरात कुर्ला, चेंबूर या भागातही मोठ्या प्रमाणात शेकोटी पेटवण्यासाठी कचर्याचा वापर केल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. ( Pollution )