नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील तिहार तुरुंगात बंद असलेला कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Musewala) याच्या हत्येची कबुली दिल्ली पोलिसांना दिली आहे. तुरुंगात बसून कारवाया करणाऱ्या बिष्णोईवर आधीपासून पोलिसांचा संशय होता. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून दिल्ली पोलिसांकडून बिष्णोईची चौकशी सुरु होती.
आमच्या टोळीच्या लोकांनी सिद्धू मुसेवाला (Sidhu Musewala) याची हत्या केली आहे, अशी कबुली बिष्णोई याने पोलिसांना तपासादरम्यान दिली असल्याचे सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. महाविद्यालयात शिकत असताना विक्की मिदुखेडा याला मी मोठ्या भावासारखे मानले होते. त्याच्या हत्येचा बदला घेण्यात आला आहे. हे काम माझे नाही, कारण मी तुरुंगात बंद आहे आणि मोबाईल फोनचा वापरही करीत नाही. पण सिद्धू मुसेवाला हत्येमागे आमच्या टोळीचे लोक सामील आहेत, असे बिष्णोई याने पोलिसांना सांगितले. मूसेवाला हत्याकांडाची माहिती आपणास टीव्ही पाहिल्यानंतर समजल्याचेही बिष्णोई याने पोलिसांसमोर स्पष्ट केले.
कॅनडामध्ये बसून गँग चालविणारा गोल्डी बरार तसेच लॉरेन्स बिष्णोई यांनी सिद्धू मुसेवाला याची हत्या केल्याची माहिती पंजाब पोलिसांकडून देण्यात आली होती. बिष्णोई टोळीतील सचिन बिष्णोई मूसेवालाच्या हत्येत सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. मुसेवाला याची हत्या पंजाबमध्ये झाली होती, मात्र हत्येचे धागेदोरे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, उत्तर प्रदेशपासून कॅनडापर्यंत मिळाले आहे. लॉरेन्स बिष्णोई याचा साथीदार संपत नेहरा याला पंजाब पोलिसांनी याआधीच राजस्थानमधून चौकशीसाठी पंजाबमध्ये नेले आहे. त्याच्या चौकशीतून मुसेवालाला मारणाऱ्या शार्प शूटर्सची माहिती समोर येण्याचा पोलिसांचा कयास आहे.
हेही वाचलंत का ?