Ganesh Utsav 2023 : ज्ञानदेवांची गणेश वंदना

Ganesh Utsav 2023 : ज्ञानदेवांची गणेश वंदना

Ganesh Utsav 2023 : गणेश ही ज्ञानाची देवता. गणेशाच्या मस्तकावर असणार्‍या दोन उंचवट्यांप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन सिद्धांत आहेत. उंचवटे दोन असले तरी त्या दोहोंनी मिळून बनणारे मस्तक एकच असते. त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे विलीन होतात, तेथे विश्वाच्या अतीत असणारी एकली एक अशी आत्मवस्तू गवसते, असे ज्ञानदेव सूचित करतात.

ॐ नमो जी आद्या । वेदप्रतिपाद्या ।
जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥

अशा प्रकारे 'ज्ञानेश्वरी'तील पहिल्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीत ज्ञानदेवांनी आद्य अशा आत्मरूपाला नमन केले आहे. हे आत्मरूप कसे आहे, तर वेदप्रतिपाद्य आणि स्वसंवेद्य आहे. आत्मरूप हा वेदांच्या प्रतिपादनाचा किंवा (शास्त्रीय) चर्चेचा विषय असल्यामुळे ज्ञानदेव त्याला वेदप्रतिपाद्या म्हणतात; परंतु ज्ञानदेवांच्या मते आत्मरूप हे केवळ शास्त्रीय ज्ञानाचा वा चर्चेचा विषय नाही, ते स्वसंवेद्यही आहे. डॉ. सदानंद मोरे यासंदर्भात म्हणतात,

स्वसंवेद्यता ही प्राधान्याने सौंदर्यशास्त्रातील किंवा साहित्य/काव्यशास्त्रातील संकल्पना आहे. तिचा संबंध रसास्वादाशी आहे. ज्ञानदेवांना असे म्हणायचे आहे की, आत्मरूप ज्याप्रमाणे शास्त्रीय ज्ञानाचा, चर्चेचा किंवा व्युत्पत्तीचा विषय आहे; तसाच तो आस्वादाचा, प्रीतीचा किंवा आनंदाचाही विषय होऊ शकतो. म्हणजे एका बाजूस तो तत्त्वज्ञानाचा विषय आहे आणि दुसर्‍या बाजूला तो काव्य-व्यवहाराचाही विषय आहे. (Ganesh Utsav 2023)

याच ओवीत ज्ञानेश्वर माऊलींनी ॐकाराचा जयजयकार केला आहे. ॐ हा मूलध्वनी आहे व शब्द ध्वनिरूप असल्याने संपूर्ण सारस्वत ही एक प्रचंड गणेशमूर्ती आहे, अशी कल्पना करून माऊलींनी पहिली ओवी लिहिली आहे. माऊली म्हणतात, मी निवृत्तीदास ज्ञानदेव सांगतो आहे, ऐकावे महाराज, अखिल सारस्वत – मग त्याचा कर्ता कोणीही असो, विषय काहीही असो, हेतू कोणताही असो – ते केवळ त्या एका आदिबीज ॐकाराचाच विस्तार आहे. यासंदर्भात डॉ. सदानंद मोरे म्हणतात, मानवी व्यवहारांमध्ये भाषेचे अथवा वाणीचे स्थान महत्त्वाचे किंबहुना अनन्यसाधारण आहे. महाभारतामध्ये एक इंद्र-काश्यप संवाद आहे. काश्यप हा काही कारणांमुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त झालेला असतो. त्याला या विचारापासून परावृत्त करण्यासाठी इंद्र चार समजुतीच्या गोष्टी सांगतो. त्यात मानवी जन्म किती महत्त्वाचा आहे याचाही विचार आलेला आहे.

मानवप्राणी हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व श्रेष्ठ का आहे, याची मीमांसा करताना इंद्र सांगतो की, माणसाला हात आणि जीभ ही इंद्रिये असल्यामुळे माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ ठरला व त्याने प्राण्यांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. हात म्हणजे श्रमशक्ती (श्ररर्लेीी) आणि जीभ म्हणजे बोलण्याची शक्ती किंवा भाषा होय. भाषा हे विचार करण्याचे त्याचप्रमाणे विचार संक्रमित करण्याचे साधन आहे व त्यामुळे मानव एका पिढीतले विचारधन दुसर्‍या पिढीला अनायासे देऊ शकतो. किंबहुना असेही म्हणता येईल की, मानवाची वेगवेगळ्या क्षेत्रांना व्यापणारी जी निर्मितीक्षमता आहे, तिचा भाषा किंवा शब्द हा आधार आहे. विचार आणि भाषा यांचा निकट संबंध असल्यामुळेच की काय, ग्रीक भाषेत श्रेसेी या शब्दाचे विचार व शब्द असे दोन्ही अर्थ होतात. त्यानुसार मनुष्य विचार करणारा प्राणी आहे. याचा अर्थ मनुष्य बोलणारा म्हणजे भाषेचा उपयोग करणारा प्राणी आहे, असाही होतो. आरंभी शब्द होता आणि शब्दच देव होता, अशा प्रकारचा विचार पाश्चात्त्य परंपरेत रूढ होता. 'तुका म्हणे पाहा, शब्दचि हा देव' असे संत तुकाराम महाराजांनीही म्हटले आहेच. Ganesh Utsav 2023

प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान आणि व्याकरण यांच्यामध्ये शब्दब्रह्माची संकल्पना आढळते. ब्रह्म म्हणजे अंतिम सद्वस्तू. जगाचे मूळ कारण. मग शब्दालाही 'ब्रह्म' का म्हटले? त्याचे कारण असे की, शब्द आणि अर्थ यांच्यामध्ये वाच्यवाचकतेचा संबंध असतो. ब्रह्म हे वाच्य किंवा प्रतिपाद्य असेल तर त्याचा वाचक किंवा प्रतिपादक असा जो शब्द, त्यालाही ब्रह्मच म्हणावे, अशी यामागची भूमिका आहे. तात्त्विक किंवा शास्त्रीय व्यवहार आणि काव्यात्म व्यवहार यांच्यातही एक महत्त्वाचे साम्य म्हणजे ते दोन्ही व्यवहार शब्दांनी-भाषेने होतात. साहजिकच, ज्ञानदेवांची शब्दब्रह्माची संकल्पनाही अधिक व्यापक बनली. भर्तृहरीच्या शब्दब्रह्मात वेद, वेदांगे, स्मृती, दर्शने यांचाच समावेश होतो; तर ज्ञानदेवांनी त्यांच्या शब्दब्रह्मात काव्य व नाटक यांचाही समावेश केला. Ganesh Utsav 2023

देखा काव्य नाटका ।
जे निर्धारिता सकौतुका ।
त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।
अर्थध्वनी ॥

या ओवीत ज्ञानदेवांनी शब्दब्रह्मात काव्य आणि नाटक यांचा समावेश केलेला आहे. काव्यनाटक हा रसनिर्मितीचा व आस्वादाचा भाग आहे, हे लक्षात घेतले म्हणजे त्यांचा संबंध स्वसंवेद्यतेशी आहे, हे समजते. विशेष म्हणजे काव्यनाटकांना 'घंटिका' असे म्हणून ज्ञानदेवांनी आचार्य आनंदवर्धनांचा 'ध्वनिसिद्धान्त' (अर्थात रससिद्धांतासह) सांगितला आहे. अस्सल काव्यातला (वा नाटकातला) अर्थ हा वाच्यार्थ वा लक्ष्यार्थ नसून ध्वन्यर्थ असतो, असा आनंदवर्धनांचा व अभिनवगुप्तांचाही पक्ष आहे. या काश्मिरी शैव आचार्यांच्या तत्त्वज्ञानाशी ज्ञानदेवांचा चांगलाच परिचय होता. ध्वन्यर्थ म्हणजे काय, हे स्पष्ट करताना हे आचार्य घंटेच्या अनुरणनाचा द़ृष्टांत योजतात. घंटेवर टोल पडला असता, पहिल्या आघाताच्या आवाजानंतर एकामागून एक आवाजाच्या लहरी उत्पन्न होतात. त्याप्रमाणे शब्दाच्या उच्चारानंतर, त्याचा वाच्यार्थ समजल्यानंतर ज्या अर्थलहरी किंवा तरंग निर्माण होतात तो ध्वन्यर्थ. हा अशा प्रकारे काव्याचा सूचित अर्थ होय. ज्ञानदेवांनी घंटेचाच दाखला दिलेला आहे. अर्थध्वनी म्हणजे ध्वन्यर्थ. ध्वन्यर्थाचा रसप्रतीतीशी निकट संबंध आहे. प्रतिपादनाच्या व्यवहारात रसनिर्मितीचा प्रश्नच उद्भवत नाही. आस्वादाच्या व्यवहारात मात्र रस हा प्राण आहे.Ganesh Utsav 2023

पातंजल, सांख्य, वैशेषिक, न्याय, पूर्वमीमांसा (कर्मकांड) व उत्तरमीमांसा (वेदांत) या सहा दर्शनास 'षड्दर्शने' म्हणतात. हे गणपतीचे सहा हात आहेत. या सहाही दर्शनांमध्ये एकवाक्यता नाही. असलाच तर विरोधच आहे. तेव्हा देवांनी त्या तत्त्वज्ञानांची आयुधे केली. भक्तांच्या अज्ञानाचा नाश यातील कोणत्या तरी एका आयुधाने होईलच, असा त्यांचा विचार असावा. श्री गणेशाच्या हातातील काही आयुधांचा आपण विचार करू. गणेशाच्या एका हातात तर्करूपी परशु आहे. देवदत्त पटनायक परशुसंदर्भात म्हणतात, परशु किंवा कुर्‍हाड हे विश्लेषणाचे प्रतीक आहे. कुठल्याही गोष्टीची घटकशः म्हणजेच छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये पाहणी करीत त्याच्या विश्लेषण-पृथ्थकरणासह त्यांच्या गाभ्यापर्यंत, अगदी अणू-रेणूपर्यंत आपल्याला जाता यायला हवे. अभ्यासाची ही रीतच परशुचे निदर्शन करते. Ganesh Utsav 2023

श्री गणेशाच्या दुसर्‍या हातात नीतिभेदरूपी अंकुश आहे. यासंदर्भात देवदत्त पटनायक म्हणतात, गणेश नेहमी हातामध्ये (हत्ती नियंत्रक) अंकुश धारण केलेला आजवरच्या नानाविध प्रतिमांत दर्शवला गेला आहे. हा अंकुश दोन टोकांचा – एक टोक टोकदार, धारदार. ज्याच्या साहाय्याने माहूत हत्तीला आपल्या ताब्यात ठेवतो किंवा पुढे चालण्यासंबंधी आज्ञा देतो. दुसरे टोक असते वळणदार हूक. ज्याचा उपयोग करून तो हत्तीला नियंत्रित करतो. एकूणच, अंकुश हा नियंत्रक आणि प्रेरणा (सरंक्षक) या दोन्ही अंगाने उपयुक्त ठरतो. माहूत जंगली व पाळीव हत्तीला नियंत्रित वा प्रेरित करून त्याच्याकरवी आपली कामे करून घेतो. माहूताच्या या अंकुशाने हत्ती त्याच्या पूर्ण आधिपत्त्याखाली काम करतो. त्याचप्रमाणे गणेशाचा अंकुशही माणसाला आपली बुद्धी व भावभावना तसेच आपल्या इच्छा-आकांक्षा संयमित करण्यासाठी उपयुक्त ठरतो. तसे पाहिले तर प्रत्येकात काही ना काही प्रमाणात हिंसात्मकता, पाशवी शक्ती दडलेली असते आणि त्यावर अंकुश म्हणजेच आपली विवेकनिष्ठ आणि तरल सावधान अवधानता. सारांश, जीवन जगण्याची कला आत्मसात करीत संपूर्ण चांगुलपणात जगणे आणि आयुष्याचे पावित्र्य जपणे फार महत्त्वाचे आहे. Ganesh Utsav 2023

गणेशाच्या या वर्णनात आणखी एक लक्षणीय स्थळ आहे, ते तत्त्वज्ञानाच्या अंगाने जाणारे आहे, सतराव्या ओवीत ज्ञानदेवांनी म्हटले आहे,

द्वैताद्वैत तेचि निकुंभ ।
सरिसे एकवटती इभमस्तकावरी ॥

यासंदर्भात डॉक्टर वि. रा. करंदीकर म्हणतात,
भाष्यकारांच्या ग्रंथांतून ज्या निरनिराळ्या तत्त्वज्ञानप्रणालींचे दर्शन घडते, त्यांमध्ये शंकराचार्यांचे अद्वैत व रामानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैत हे दोन सिद्धान्त ज्ञानदेवांच्या आधीच्या कालातील. ज्ञानदेवांच्यानंतर मांडली गेलेली जी मते आहेत, त्यांमध्ये द्वैताद्वैत या नावाचेही एक आहे, ते येथे अभिप्रेत असणे अर्थातच शक्य नाही. शिवाय ओवीचा अर्थ पाहिला की, द्वैताद्वैत या समासाने द्वैत आणि अद्वैत या दोहोंचा उल्लेख ज्ञानदेवांना करावयाचा आहे, हे आपोआप स्पष्ट होते. काय म्हणतात येथे ज्ञानदेव? गणपतीच्या मूर्तीचे वर्णन करताना वस्त्र, मेखला किंवा घंटिका यांचा उल्लेख येतो. यांचा संबंध मूर्तीच्या शरीराशी नाही. Ganesh Utsav 2023

ही बाह्य भूषणे किंवा आभरणे आहेत. शुंडादंड म्हणजे सोंड हा शरीराचा भाग आहे. या सोंडेच्या वर लगत असणारे ते गंडस्थळ, हत्तीच्या गंडस्थळावर दोन बाजूंना एकासारखे एक उंचवटे असतात आणि ते दोन्ही मिळून होते ते त्याचे गंडस्थळ. ज्ञानदेव म्हणतात की, या गणेशाच्या गंडस्थळावर द्वैत आणि अद्वैत हे दोन उंचवटे आहेत आणि ते 'सरिसे' म्हणजे एकासारखे एक असलेले उंचवटे 'इभमस्तकावरी एकवटती' म्हणजे एकरूप होतात. अद्वैत आणि विशिष्टाद्वैत या दोन प्रमुख विचारधारांमध्ये काही भेद असला, तरी काही साम्यही आहे. थोडीशी मुरड घातली तर त्या दोन सिद्धान्तांमध्ये एकवाक्यता साधता येते. द्वैत आणि अद्वैत हे दोन परस्परांना पूर्णपणे विरोधी असणारे सिद्धान्त आहेत. ते एकत्र कसे आणता येणार? पण ज्ञानदेवांच्या द़ृष्टीने ते दोन्ही एकसारखे आहेत, म्हणजे अद्वैत महत्त्वाचे आहे तसेच द्वैतही महत्त्वाचे आहे आणि हे दोन्ही गणेशाच्या मस्तकावर एकरूप झालेले आहेत. एका उंचवट्याने गंडस्थळाचे रूप प्रकट होत नाही. दोन बाजूंना दोन समान उंचवटे असतात आणि त्या दोहोंच्या समवायातून हत्तीचे एकरूप मस्तक डोळ्यांसमोर येते. श्री गणेश ही ज्ञानाची देवता! मस्तक हे ज्याप्रमाणे शरीरात सर्वोच्च स्थानी असते, त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे एकरूप होतात तेथे अध्यात्मज्ञानाची चरमसीमा येते, असाही या विचाराचा ज्ञानाच्या अंगाने अर्थ लागतो. तोही ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. Ganesh Utsav 2023

शिव आणि शक्ती यांच्या अतीत असणार्‍या मूळ आत्मवस्तूच्या विश्वरूप आविष्कारामधील त्या दोहोंचे कार्य भिन्न आहे. तेव्हा या द़ृष्टीने पाहता, त्या दोहोंत द्वैत आहे; पण त्याचवेळी ती परस्परांच्या तुलनेने कोणत्याही प्रकारे उणी-अधिक नाहीत. शिवाय स्वरूपतः ती एकच आहेत.

शिव आणि शक्ती म्हणजे एकाच आत्मवस्तूचा दोन रूपांमध्ये होणारा आविष्कार आहे. या द़ृष्टीने त्या दोहींचे मूलतत्त्व अद्वैतच आहे. 'अनुभवामृता'च्या प्रारंभी शिव-शक्तींच्या समरूपत्वाप्रमाणेच या अद्वैताचा उल्लेख ज्ञानदेवांनी केला आहे. द्वैत तर आहे; पण तरी स्वरूपतः अद्वैत आहे, अशी ही ज्ञानदेवांची मांडणी आहे. गणेशाच्या मस्तकावर असणार्‍या दोन उंचवट्यांप्रमाणे द्वैत आणि अद्वैत हे दोन सिद्धान्त आहेत आणि तसे असूनही उंचवटे दोन असले तरी त्या दोहोंनी मिळून बनणारे मस्तक एकच असते. त्याप्रमाणे द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही जेथे विलीन होतात, तेथे विश्वाच्या अतीत असणारी एकली एक अशी आत्मवस्तू गवसते, असे ज्ञानदेव सूचित करतात. गणेशाच्या मस्तकाचे वर्णन करताना आपल्या तत्त्वज्ञानातील गाभ्याच्या सिद्धान्तावर ज्ञानदेव जाताजाता सहज बोट ठेवतात. Ganesh Utsav 2023

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news