बहार विशेष : भारताची महत्त्वाकांक्षी गगनभरारी

बहार विशेष : भारताची महत्त्वाकांक्षी गगनभरारी
Published on
Updated on

गगनयान हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. गगनयान अवकाशात पाठविण्यापूर्वी एकंदर चार चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांमध्ये अवकाशवीर सहभागी होणार नाहीत. म्हणजेच ही उड्डाणं मानवरहित असतील. संपूर्ण मोहिमेच्या यशाची आणि अवकाशवीरांच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री पटल्यानंतरच सन 2025 मध्ये गगनयान भारतीय अवकाशवीरांना घेऊन अवकाशात झेप घेईल.

गगनयान मोहीम यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेलं एक पाऊल गेल्या 20 ऑक्टोबरला 'इस्रो'नं टाकलं आहे. त्या दिवशी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अवकाशवीरांना सुखरूपपणे उतरविण्याची 'इस्रो'नं घेतलेली चाचणी यशस्वी झाली. अजून चार चाचण्या घेण्यात येणार आहेत. त्या यशस्वी झाल्यानंतरच सन 2025 मध्ये भारतीय अवकाशवीरांना घेऊन गगनयान आकाशात झेप घेईल. या अवकाशवीरांचं प्रशिक्षण सध्या सुरू आहे. त्यांच्याबरोबर 'व्योममित्रा' नावाची एक यांत्रवही पाठविण्यात येणार आहे. महिलेच्या रूपातली ही यांत्रवही अनेक शास्त्रीय प्रयोग अवकाशात करणार आहे. गगनयान हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. अशा प्रकल्पाची तयारी प्रदीर्घ काळ सुरू असते. आज प्रकल्प जाहीर केला आणि तीन किंवा चार वर्षांनी तो प्रत्यक्षात आला, असं होत नाही. एकंदरच विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये झटपट असं काहीच होत नसतं. प्रयोग, पुनःपुन्हा प्रयोग, निरीक्षणं, चाचणी, निष्कर्ष याची अनेक आवर्तनं केल्यानंतरच आणि नवीन गोष्ट सर्व वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्णपणं उतरल्यावरच विज्ञान त्या गोष्टीचा स्वीकार करते. तो केल्यानंतर कालांतरानं त्याला छेद देणारं काही सिद्ध झालं, तर त्याचा स्वीकार करते. स्वतःला दुरुस्त करत राहते. सतत विकसित करत राहते. या प्रकियेतूनच विज्ञान पुढं जात असतं. वैज्ञानिक प्रगती होत असते. 'गगनयान'च्या बाबतीतसुद्धा ही गोष्ट खरी आहे.

गगनयानच्या संदर्भातील प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास आणि गगनयानसाठी तंत्रज्ञान विकसित करणं या दोनही गोष्टींची सुरुवात झाली, ती सन 2006 मध्ये! त्यावेळी आपलं यान साधारणपणं एक आठवडा अवकाशात भ्रमण करत राहील, असं गृहीत धरण्यात आलं होतं. त्यामुळं या काळात आपल्या दोन अवकाशवीरांना संशोधन करता येईल, अशा तर्‍हेची रचना असणारं यान विकसित करण्याचं उद्दिष्ट त्यावेळी ठेवण्यात आलं होतं. एक आठवड्यानंतर हे यान पृथ्वीवर परत येईल, असंही त्यावेळीच निश्चित करण्यात आलं होतं. मात्र अवकाशात पाठविलेलं यान परत पृथ्वीवर सुखरूपपणे आणणं हे अत्यंत गुंतागुंतीचं आणि म्हणूनच जोखमीचं काम असतं. पृथ्वीच्या वातावरणात शिरताना होणार्‍या घर्षणाला यशस्वीपणे तोंड देणं आणि निश्चित केलेल्या ठिकाणी यान उतरवणं, यासाठी उच्च प्रतीचं तंत्रज्ञान आवश्यक असतं. त्या तंत्रज्ञानाच्या मदतीनंच यानाची रचना करावी लागते. त्याची तयारी 'इस्रो'नं केली आणि या प्रकल्पासाठी भारत सरकारनं आवश्यक तो निधी द्यावा यासाठी तो प्रकल्प मार्च 2008 मध्ये भारत सरकारकडे सादर केला. या प्रकल्पाला 2009 मध्ये भारत सरकारनं मान्यता दिली. मात्र प्रकल्पाला आवश्यक तितका निधी मंजूर करण्यात आला नाही. 2013 मध्ये तर अवकाशवीरांना घेऊन अंतराळात जाण्याचा कार्यक्रम 'इस्रो' हाती घेऊ शकणार नाही, असा कार्यकम हा 'इस्रो'च्या प्राधान्य देऊन हाती घेण्याच्या प्रकल्पांमध्ये येत नाही, असं जाहीर करण्यात आलं. मात्र 2014 च्या सुरुवातीला या प्रकल्पाचा पुनर्विचार करण्यात आला आणि फेब्रुवारी 2014 मध्ये या प्रकल्पाला द्यावयाच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली.

गगनयानची बांधणी केली जात आहे, ती जानेवारी 2007 मध्ये केल्या गेलेल्या एका यशस्वी प्रयोगाच्या आधारावर. त्यावेळी 550 किलो वजनाचं अवकाशयान सोडण्यात आलं आणि ते यशस्वीपणं परत पृथ्वीवर आणण्यात आलं. या प्रयोगाचं नाव आहे, 'स्पेस कॅप्सूल रिकव्हरी एक्सपरिमेंट किंवा एसआरई' या प्रयोगानंतर 2017 मध्ये 'इस्रो'नं भारतीय अवकाशवीराला अवकाशात पाठविण्याच्या कार्यक्रमामध्ये आवश्यक ती प्रगती केली आणि मग या प्रकल्पाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली. भारतीय अवकाशवीरांना सात दिवस अंतराळात घेऊन जाऊन तिथं नियोजित प्रयोग करण्याच्या या मोहिमेला जवळपास 10 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.

भारतीय तरुण किंवा तरुणीला अवकाशात घेऊन जाणारं 'गगनयान' भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) विकसित करत आहे. या मोहिमेमध्ये मदत करण्यासाठी भारतानं रशिया आणि फ्रान्स या देशांशी बोलणी केली आहेत. त्याप्रमाणं या मोहिमेसाठी रशिया भारताला मदत करणार आहे. ही मदत अवकाश-वीरांना आवश्यक ते प्रशिक्षण देणं आणि गगनयान अवकाशात घेऊन जाणारं रॉकेट विकसित करण्यातील काही बाबींमध्ये साहाय्य करणं या स्वरूपाची आहे. अवकाशवीरांना बरंचसं प्रशिक्षण हे बंगळूरमध्येसुद्धा देण्यात येत आहे. तर फ्रान्सची मदत अवकाशवीरांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणं, अवकाशात आवश्यक असणारी औषधं, यानाचं विविध प्रारणांपासून संरक्षण करणं यासंदर्भात असणार आहे. अवकाशातील यान पृथ्वीवर परत सुखरूपपणे आणणं, काही आणीबाणीचा प्रसंग उभा राहिला तर अवकाशवीरांना आपल्या यानातून यशस्वीपणे बाहेर पडता येण्यासाठी लागणारं तंत्रज्ञान विकसित करणं, अतिउष्णतेला यशस्वीपणे तोंड देण्यासाठी आवश्यक ते संरक्षक कवच विकसित करणं, या बाबी भारतानं यशस्वीपणे आत्मसात केल्या आहेत. त्यांच्या यशस्वी चाचण्यासुद्धा घेण्यात आल्या आहेत.

'गगनयान' या भारतीय अवकाशयानामध्ये 'सर्व्हिस मोड्यूल' आणि 'क्र्यू मोड्यूल' असे दोन भाग असतील. या दोघांचं मिळून भ्रमणयान (ऑर्बिटल) तयार होईल. त्याचं एकंदर वजन सुमारे सात टन असेल. यानाचा आकार 3.7 मीटर बाय 7 मीटर असा असेल. या यानामधील अवकाशवीर अवकाशात 'मायक्रोग्रॅव्हिटी'च्या संदर्भात संशोधन करतील. म्हणजे असं की, पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणामुळं काही प्रयोग आपल्याला इथं करता येत नाहीत. अवकाशात गेल्यानंतर यानात गुरुत्वाकर्षण अगदीच अल्प प्रमाणात असतं. त्यामुळं ज्या प्रकारचे प्रयोग पृथ्वीवर करता येत नाहीत, ते त्या अगदी कमी गुरुत्वाकर्षणाच्या अवस्थेमध्ये करता येतात. त्यामुळंच आजच्या घटकेला आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकामध्ये असे जवळपास 300 प्रयोग करण्यात येत आहेत. हे वास्तव लक्षात घेतलं की, आपले अवकाशवीर गगनयानामध्ये जे प्रयोग करतील त्यांचं महत्त्व ध्यानात येईल.

अवकाशामध्ये भ्रमणयानातील दोनही मोड्यूल्सनी ठरलेल्या ठिकाणी एकत्र येणं आणि त्यांची जोडणी होणं, या दोनही गोष्टी करता येतील अशा रीतीनंच भ्रमणयान नव्यानं विकसित करण्यात आलं आहे. या अवकाशयात्रेसाठी भारतीय हवाई दलातून एकंदर दहा जणांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्यामधून दोघांची अवकाशयात्रेसाठी निवड करण्यात येईल. गगनयान अवकाशात पाठविण्यापूर्वी एकंदर चार चाचण्या घेण्यात येतील. या चाचण्यांमध्ये अवकाशवीर सहभागी होणार नाहीत. म्हणजेच ही उड्डाणं मानवरहित असतील. संपूर्ण मोहिमेच्या यशाची आणि अवकाशवीरांच्या सुरक्षिततेची संपूर्ण खात्री पटल्यानंतरच सन 2025 मध्ये गगनयान भारतीय अवकाशवीरांना घेऊन अवकाशात झेप घेईल.

जीएसएलव्ही एमके-3 (GSLV MK III) हे रॉकेट गगनयानाला घेऊन अवकाशात त्याच्या नियोजित कक्षेमध्ये, म्हणजे पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर सोडेल. जीएसएलव्ही एमके तीन हे रॉकेट इस्रोनंच विकसित केलं आहे. या रॉकेटची क्षमता चार टन वजनाचा उपग्रह जीओसिन्क्रोनस ट्रान्स्फर ऑर्बिटमध्ये (पृथ्वीपासून 35,786 किमी उंचीपर्यंत) किंवा 10 टन वजन 'लो अर्थ ऑर्बिट'मध्ये (पृथ्वीपासून 2000 किमीच्या आतपर्यंत) नेण्याची आहे. प्रदीर्घ काळ चाललेल्या या मोहिमेमुळं रोजगाराच्या एकंदर 15 हजार नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय 1) देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पातळी उंचावणं, 2) अनेक संस्था, अभ्यासक आणि उद्योग यांचा सहभाग या राष्ट्रीय प्रकल्पात असणं, 3) देशातील औद्योगिक वाढीला चालना देणं, 4) देशातील तरुणांना प्रेरणा देणं, 5) समाजाच्या उपयोगी पडेल असेल असं तंत्रज्ञान विकसित करणं, 6) आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ करणं, अशी ध्येयं या मोहिमेमागे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक अवकाश संशोधन मोहिमेसाठी विविध प्रकारचं तंत्रज्ञान विकसित करावं लागतं. गगनयान मोहिमेच्या निमित्तानंसुद्धा अनेक प्रकारची तंत्रज्ञानं विकसित केली गेली आहेत आणि होतील.

या सार्‍यांचा उपयोग देशाच्या एकंदर विकासासाठी करण्यावर भारत सरकारचा भर आहे. या मोहिमेचा अनेक क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. या मोहिमेमुळं देशातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील संशोधनाला चालना मिळेल. वैद्यकशास्त्र, शेती, औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण, कचर्‍याचं व्यवस्थापन, जल आणि अन्न संसाधनांचं व्यवस्थापन अशा गोष्टींसाठी आवश्यक ते तंत्रज्ञान विकसित होण्याची क्षमतासुद्धा या मोहिमेमध्ये आहे. भविष्यामध्ये आवश्यक ठरू शकणारं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी आवश्यक ते प्रयोग करण्याची संधी या मोहिमेमुळं आपल्याला मिळणार आहे. याचं कारण आपले अवकाशवीर अगदी कमी गुरुत्वाकर्षणामध्ये करता येणारे महत्त्वाचे प्रयोग आपल्या अवकाशातील मुक्कामात करणार आहेत. या मोहिमेमुळं देशाच्या आर्थिक विकासाला गती मिळू शकेल.

औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि विस्तार होण्यासाठीसुद्धा या मोहिमेचा हातभार लागणार आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की, या मोहिमेनंतर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा वाढेल. या पुढच्या काळामध्ये दूरवरच्या अवकाश संशोधनाच्या कार्यक्रमांमध्ये भारत इतर देशांबरोबर सामील होऊ शकेल. त्याचा फायदा भारताला अनेकांगांनी होईल. थोडक्यात, ही मोहीम म्हणजे भारताची महत्त्वाकांक्षी गगनभरारीच आहे.

सोळाव्या मिनिटाला पोहोचणार!

1) जीएसएलव्ही एमके तीन या रॉकेटनं झेप घेतल्यानंतर गगनयान आपल्या नियोजित कक्षेमध्ये 16 व्या मिनिटाला पोहोचेल. 2) भारतीय अवकाशवीर पाच ते सात दिवस अवकाशात राहतील. 3) गगनयान हे पृथ्वीपासून 300 ते 400 किमी उंचीवरच्या कक्षेमध्ये असेल. 4) गगनयान पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल. एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास गगनयानाला 90 मिनिटे लागतील. या दीड तासामध्ये अवकाशवीरांना सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येईल. 5) आपला परतीचा प्रवास सुरू केल्यापासून पृथ्वीवर परत येण्यासाठी गगनयानाला 36 तास लागतील. पृथ्वीच्या वातावरणात शिरल्यानंतर ते गुजरात राज्याच्या किनार्‍याजवळ अरबी समुद्रात उतरेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news