पर्यावरण संवर्धन कागदावरच ; गडकिल्ल्यांना प्लास्टिकचा विळखा

पर्यावरण संवर्धन कागदावरच ; गडकिल्ल्यांना प्लास्टिकचा विळखा
Published on
Updated on

वेल्हे : अलीकडच्या काळात प्रचंड संख्येने वाढलेल्या पर्यटनामुळे सिंहगड, राजगड, तोरणा आदी गडकिल्ल्यांना विघातक प्लास्टिकच्या कचर्‍याचा विळखा पडत चालला आहे. तसेच, सह्याद्रीच्या डोंगररांगांतील रस्त्यांसह ओढे-नाले कचर्‍याचे आगार बनली आहेत.
वाढत्या कचर्‍यामुळे विलोभनीय वनसंपदेचा श्वास कोंडून निसर्गाची मोठी हानी सुरू असल्याचे जागोजागी साचलेल्या कचर्‍यावरून दिसून येत आहे. तर, प्लास्टिक बंदी, पर्यावरण संवर्धन केवळ कागदावरच असल्याचे गंभीर चित्रही पुढे आले आहे. प्लास्टिक कचर्‍याचे ढीग सिंहगड, राजगड, तोरणा किल्ल्यांचे बुरुज, तटबंदीखालील कडेकपारीत पडले आहेत.

संबंधित बातम्या :

असेच भयावह चित्र सह्याद्रीच्या डोंगररांगांतील पुणे-पानशेत रस्ता, एनडीए-बहुली रस्ता, नसरापूर-वेल्हे रस्त्यासह केळद, मढेघाट आदी ठिकाणी आहे. खडकवासला धरणाच्या तीरावरून जाणार्‍या पुणे-पानशेत रस्त्याची स्थिती सर्वांत गंभीर आहे. धरणापासून डोणजे, गोर्‍हे, खानापूर, मणेरवाडी, मालखेड, सोनापूर, ओसाडेपासून थेट वरसगाव, पानशेत धरणापर्यंत रस्त्यांच्या दोन्ही बाजूला जागोजागी प्लास्टिक कचरा साचलेला आहे. रस्त्यावरील पूल, मोर्‍या, ओढे-नालेही कचर्‍याच्या ढिगार्‍याखाली गाडले आहेत. पावसाळ्यात सडलेला कचरा वाहून धरणात मिळत आहे.

सिंहगड किल्ला, पानशेत रस्ता व परिसरातील कचर्‍याच्या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायत, लोकसहभागातून प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. केवळ कागदावर रेघोट्या मारून उपयोग होणार नाही; अन्यथा भविष्यात निसर्गाचे वरदान लाभलेल्या या परिसराचे विद्रुपीकरण होईल, असे माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांनी सांगितले.
तर, पुणे-पानशेत रस्त्यावर पडलेल्या कचर्‍यावर मोकाट कुत्र्यांच्या, जनावरांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना ये-जा करताना जीव मुठीत धरावा लागत आहे. दिवसा-रात्रीही दुचाकीस्वार, गुराख्यांवर कुत्रे हल्ला करतात. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत, असे मणेरवाडीच्या सरपंच अनिता थोपटे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news