गडहिंग्लज गांजा विक्रीसह उत्पादनाचेही केंद्र

file photo
file photo
Published on
Updated on

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : गडहिंग्लज तालुक्यामध्ये हेब्बाळ येथे गांजाची शेती करणार्‍यांवर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करून तब्बल 7 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, 7 ते 8 फुटांची 75 झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही झाडे इतकी मोठी होईपर्यंत स्थानिक यंत्रणेला कोणतीही माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून गडहिंग्लज हे गांजा विक्रीचे केंद्रच बनले असून, आता उत्पादकही बनल्याचे दिसून आले आहे. यापूर्वी गेल्या चार वर्षांत अनेकदा गांजा विक्रीविरोधात कारवाई झाली आहे. मात्र, याची पाळेमुळे शोधून कारवाईची गरज बनली आहे.

कर्नाटक व गोव्यातील खरेदी-विक्री करणारी मंडळी गडहिंग्लजला मध्यवर्ती केंद्र मानून या ठिकाणी हात-पाय पसरवत असल्याने गडहिंग्लज गांजा विक्री केंद्र म्हणून सध्या चर्चेत आले होते.

गांजाशी संबंधित लोकांची ऊठबसही निर्जनस्थळी वाढली असून, पोलिसांनी आता या स्थळांचा शोध घेऊन गांजा विक्रीची पाळेमुळे खोदून काढण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गडहिंग्लजमध्ये गांजाचा धूर निघत असून, सुरुवातीला नशा करणारी ही युवक मंडळी कर्नाटकातून गांजा आणून गडहिंग्लजमध्ये निर्जन ठिकाणांमध्ये गांजाचा धूर काढत होती. गांजा ओढणार्‍यांची संख्या वाढल्यानंतर गांजा पुरवठादार तयार झाले असून, यातून गडहिंग्लजमध्ये सुरुवातीला काहीशा ग्रॅममध्ये येणारा गांजा आता किलोमध्ये येऊ लागला आहे. कर्नाटक परिसरातून मोठ्या प्रमाणात गांजा येऊ लागल्याने त्याची विक्रीही याच ठिकाणाहून होत असल्याचे दिसून येत आहे. आता तर थेट गांजाचे उत्पादनच गडहिंग्लजला केले जात आहे.

गोव्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असून, त्यासाठी यातील काही एजंट गडहिंग्लजमधील विक्रेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होऊ लागली आहे. यातूनच गांजा विक्री करणारी टोळी उदयास आली आहे.

दै. 'पुढारी'कडून चार वर्षांपूर्वीच पर्दाफाश

गडहिंग्लज हे गांजा विक्रीचे केंद्र बनत चालले असल्याचे सविस्तर वृत्त दै. 'पुढारी'ने चार वर्षांपूर्वी प्रसिद्ध करत, याची पाळेमुळे शोधावीत; अन्यथा गांजाचे उत्पादनही होईल, असे स्पष्ट केले होते. आता गडहिंग्लजला गांजा उत्पादनच केले गेल्याने दै. 'पुढारी'चे वृत्त खरे ठरले असून, अजूनही वेळ गेली नसून, पोलिसांनी गडहिंग्लजमधील गांजाचे तस्कर शोधणे आवश्यक आहे; अन्यथा गडहिंग्लज नशा केंद्र बनण्यास वेळ लागणार नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news