कोल्हापूर : फरार उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांना पाचगणीत बेड्या

कोल्हापूर : फरार उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील यांना पाचगणीत बेड्या

कोल्हापूर : बीअर शॉपीचा परवाना मंजूर करण्यासाठी एक लाखाच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्कचे फरार अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (वय 54, रा. आर.के.नगर, कोल्हापूर, मूळ रा. शिरदवाड, ता. शिरोळ) यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथे अटक केले.

चंद्रपूर शहर पोलिसांनी संजय पाटील यांना चंद्रपूर येथील न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी बजावली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलिस उपअधीक्षक मंजुषा भोसले संजय पाटील यांच्याकडे सखोल चौकशी करीत आहेत.

बीअर शॉपीच्या परवान्यासाठी तक्रारदार व्यावसायिकाकडे अधीक्षक संजय पाटील यांच्या सांगण्यावरून दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे, कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ यांनी एक लाखाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे फिर्याद दाखल केल्यानंतर खताळसह खारोडे यांना रंगेहाथ जेरबंद करण्यात आले होते.

या घटनेनंतर अधीक्षक संजय पाटील कोल्हापुरातून पसार झाले होते. येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधीक्षक सरदार नाळे व पथकाने पाटील यांच्या कोल्हापूर येथील शिवाजी पेठ येथील फिरंगाई तालीम, काळकाई गल्ली, आर.के.नगर व शिरदवाड (ता. शिरोळ) येथील घरांवर छापेमारी करून 28 तोळे दागिने, आलिशान मोटार, 80 लाखांचा बंगला तसेच रोख रक्कम अशी मालमत्ता उघडकीला आणली होती.

अधीक्षक पाटील यांच्या शोधासाठी चंद्रपूर व कोल्हापूर येथील 'एसीबी'ची तीन पथके कार्यरत होती. कोल्हापूर, सातारा व पुणे जिल्ह्यांत संशयिताचा वावर असल्याचे उघड झाले होते. पथकाने पाचगणी (जि. सातारा) येथील फार्महाऊसवर छापा टाकून त्यास जेरबंद केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news