मिठापासून बनवले केवळ विजेनेच सक्रिय होणारे इंधन!

मिठापासून बनवले केवळ विजेनेच सक्रिय होणारे इंधन!

वॉशिंग्टन : अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका संशोधकाने अनोख्या इंधनाची निर्मिती केली आहे. द्रवरूप मिठापासून बनवलेले हे इंधन केवळ विद्युत प्रवाहाच्या माध्यमातूनच जळू शकते व त्यामुळे सुरक्षित आहे. इंधनाची ने-आण करताना आग लागण्याचे प्रकार आणि त्यामुळे घडलेल्या अपघातांमुळे वित्तहानी, जीवितहानी होण्याच्या दुर्घटना अनेकदा ऐकायला मिळतात. त्यावर हा चांगला उपाय शोधण्यात आला आहे.

कोणतेही इंधन हे द्रवस्थितीत असलं तरी या द्रवाच्या वरील स्तरामध्ये इंधनामधील काही अस्थिर इंधन रेणू म्हणजेच 'व्होलेटाईल फ्यूएल मॉलिक्यूल' असतात. जेव्हा हे रेणू ऑक्सिजन आणि हवेच्या संपर्कात येतात तेव्हा ते पेट घेतात. अशा रेणूंपर्यंत जर ऑक्सिजनचा पुरवठा रोखला, तर ते पेट घेण्याची शक्यता फारच कमी होते. मात्र, जेव्हा एखाद्या वाहनाच्या इंजिनमध्ये आपण या रेणूंना ऑक्सिजनपासून दूर ठेवण्याबद्दल विचार करतो तेव्हा हे लक्ष्य फारच कठीण असल्याचं जाणवतं. त्यामुळे यावर संशोधकांनी अनोख्या पद्धतीने शक्कल लढवून उपाय शोधला आहे. संशोधकांनी या इंधनासंदर्भातील पेटंट घेतलं आहे.

'जर्नल ऑफ द अमेरिकन केमिकल सोसायटी'मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात या संशोधकांनी हे इंधन कसं तयार केलं जातं याची माहिती दिली आहे. या रिपोर्टचे भारतीय वंशाचे असलेले मुख्य लेखक पृथ्वविश बिश्वास यांनी सांगितले, 'तुम्ही इंधन असलेल्या जमीनीवर काडेपेटीची काडी फेकली तर या द्रव्यरुप इंधनाच्या पृष्ठभागावर तरंगत असलेले रेणू पेट घेतात. या रेणूंमुळेच इंधनाचा गंध येतो. या रेणूंवर नियंत्रण मिळवता आलं तर इंधनाच्या ज्वलनशीलतेवर नियंत्रण मिळवता येतं. आपण जेवणात वापरतो तशाच पद्धतीचं पण द्रव स्वरूपातील मीठ हे या इंधनाचं मूळ आहे. फक्त हे मीठ लिक्विड आयर्न म्हणजेच द्रव स्वरूपातील लोहाच्या रेणूंपासून बनवलेलं असतं. हे मीठ विघळण्यासाठी लागणारं तापमान हे सर्वसामान्य मिठापेक्षा कमी आहे.

या मिठातील आयर्न फ्लूईडमधील क्लोरिन काढून त्या जागी परक्लोरेट वापरण्यात आलं आहे. अनेक चाचण्यांमधून नव्या पद्धतीने तयार करण्यात आलेलं हे इंधन केवळ विद्युत प्रवाहाच्या माध्यमातूनच सक्रिय होतं असं दिसून आलं. तसेच विद्युत प्रवाह खंडित केल्यास इंधन जळत राहत नाही. यामुळे या इंधनातून अधिक ऊर्जा मिळते आणि त्याच्या ज्वालाही अधिक प्रखर असतात. या इंधनाच्या मदतीने वाहनं अधिक सुरक्षित करता येतील. अपघात झाला किंवा चालक वाहन चालवण्याच्या स्थितीत नसेल तर एका स्वीचच्या मदतीने इंधनाची ज्वलन प्रक्रिया खंडित करता येईल. तांत्रिक दृष्ट्या हे इंधन सगळ्या पद्धतीच्या गाड्यांमध्ये वापरता येतं. मात्र, वेगवेगळ्या इंजिनमध्ये याच्या चाचण्या करणं गरजेचं आहे. तसेच हे इंधन मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याआधी ते किती परिणामकारक आहे याची चाचपणीही गरजेची आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news