French Open: जोकोविचची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक! 23व्या ग्रँडस्लॅमपासून दोन पावले दूर

French Open: जोकोविचची फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक! 23व्या ग्रँडस्लॅमपासून दोन पावले दूर

पॅरिस, पुढारी ऑनलाईन : नोव्हाक जोकोविचने (Novak Djokovic) फ्रेंच ओपनची (french open) उपांत्य फेरी गाठली आहे. त्याने उपांत्यपूर्व फेरीत 11व्या मानांकित कॅरेन खाचानोव्हचा पराभव करून अंतिम चारमध्ये आपले स्थान निश्चित केले. अशाप्रकारे सर्बियाचा हा दिग्गज खेळाडू त्याच्या कारकिर्दीतील 45व्या ग्रँडस्लॅम (tennis grand slam) आणि 12 व्या फ्रेंच ओपनची उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी झाला आहे. आता तो 23व्या ग्रँडस्लॅमपासून दोन पावले दूर आहे.

सामन्याच्या पहिल्याच सेटमध्ये कॅरॉन खाचानोव्हचे पारडे जड राहिले. त्याने जोकोविचला (Novak Djokovic) जबरदस्त झुंज दिली आणि हा सेट 4-6 ने जिंकला. दुस-या सेटमध्येही या रशियन खेळाडूने सर्बियन खेळाडूला चांगलेच झुंझवले. पण त्याला सेट जिंकता आला नाही. यावेळी चुरशीच्या लढतीनंतरही जोकोविचने (Novak Djokovic) दुसरा सेट 7-6 अशा फरकाने जिंकला. यानंतर जोकोविचने संपूर्ण सामन्यात जबरदस्त पुनरागमन करत आपले वर्चस्व कायम राखले आणि पुढील दोन सेट 6-2, 6-4 असे जिंकून शानदार विजयाची नोंद केली. हा सामना 3 तास 48 मिनिटे चालला.

जोकोविच विश्वविक्रमापासून दोन पावले दूर (French Open Novak Djokovic)

स्पॅनिश स्टार राफेल नदाल आणि जोकोविच यांनी टेनिस जगतात सर्वाधिक 22-22 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली आहेत. आता जोकोविचने फ्रेंच ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत पोहचला असून त्याने या स्पर्धेचे जेतेपद पटकावल्यास तो सर्वाधिक 23 ग्रँडस्लॅम जिंकून इतिहास रचेल. यासाठी जोकोविचला आता केवळ दोन सामने (उपांत्य फेरी आणि अंतिम) जिंकावे लागणार आहेत. विजेतेपदासह जोकोविच जागतिक क्रमवारीत अव्वल टेनिसपटू बनेल.

उपांत्य सामन्यात जोकोविच विरुद्ध कार्लोस अल्काराझ लढत

स्पेनचा स्टार टेनिसपटू कार्लोस अल्काराझने फ्रेंच ओपनमध्ये चमकदार कामगिरी सुरूच ठेवली आहे. मंगळवारी रात्री त्याने स्टेफानोस त्सित्सिपासचा सरळ सेटमध्ये पराभव करून उपांत्य फेरी गाठली. स्पर्धेतील अव्वल मानांकित 20 वर्षीय कार्लोसने 6-2, 6-1, 7-6(5) असा विजय मिळवत सामन्यावर वर्चस्व राखले. त्याने संपूर्ण सामन्यात शक्तिशाली बेसलाइन शॉट्स आणि उत्तम प्रकारे नियंत्रित ड्रॉप शॉट्स सादर केले. ज्याला त्सित्सिपासकडे उत्तर नव्हते.

या विजयासह अल्काराझने उपांत्य फेरी गाठली असून, आता त्याचा सामना नोव्हाक जोकोविचशी होणार आहे. हा सामना रोमांचक होईल यात शंका नाही. अल्काराझने आगामी सामन्याबद्दल उत्साह व्यक्त केला आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूंशी सामना खेळायला सज्ज असल्याचे त्याने म्हटले आहे.

90 वा फ्रेंच ओपन सामना जिंकला (French Open Novak Djokovic)

हा सामना जिंकण्यासोबतच जोकोविचने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. पहिली गोष्ट म्हणजे त्याने 12व्यांदा फ्रेंच ओपनच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर दुसरे म्हणजे या रोलँड गॅरोस स्पर्धेत जोकोविचने 90 वा सामना जिंकला आहे. अशी कामगिरी करणारा तो 5वा खेळाडू ठरला आहे.

45व्यांदा ग्रँडस्लॅमच्या उपांत्य फेरीत प्रवेश

जोकोविचने टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धेत 45व्यांदा उपांत्य फेरी गाठली आहे. या बाबतीत स्वित्झर्लंडचा अनुभवी रॉजर फेडरर पहिल्या क्रमांकावर आहे. तो ग्रँडस्लॅमचे 46 उपांत्य सामने खेळला आहे. तिसरा क्रमांक नदालचा आहे. त्याने आतापर्यंत एकूण 38 वेळा उपांत्य फेरीचे सामने खेळले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news