पुणे : पाणी मोफत, फक्त वाहतूक खर्च द्या ! पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यासाठी पालिकेचे एसटीपी टँकर अ‍ॅप

पुणे : पाणी मोफत, फक्त वाहतूक खर्च द्या ! पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यासाठी पालिकेचे एसटीपी टँकर अ‍ॅप

हिरा सरवदे

पुणे : महापालिकेच्या मैलापाणी जलशुद्धीकरण केंद्रात (एसटीपी) प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर वाढण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने 'पीएमसी एसटीपी वॉटर टँकर सिस्टीम' नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना प्रक्रिया केलेल्या पाण्याची मागणी ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. हे पाणी महापालिकेकडून मोफत दिले जाणार आहे. नागरिकांना केवळ टँकरचे पैसे द्यावे लागणार आहेत.

शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने नायडू, मुंढवा, खराडी, भैरोबा नाला, एरंडवणे, विठ्ठलवाडी, बाणेर, न.ता. वाडी आणि बोपोडी अशा नऊ ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारले आहेत. याशिवाय जायका प्रकल्पांतर्गत शहरात आणखी अकरा ठिकाणी एसटीपी प्रकल्प उभारले जाणार आहेत. महापालिकेचा विस्तार आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन जलकेंद्रातून नळाद्वारे मिळणारे पाणी नागरिकांनी केवळ पिण्यासाठी आणि घरगुती कारणासाठी वापरावे.

बांधकाम, बागकाम, झाडे व इतर कारणांसाठी एसटीपी प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी वापरावे, यासाठी महापालिकेकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पाची जबाबदारी असलेल्या विद्युत विभागाने हे अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपवर नागरिकांनी, बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी करून पाण्याची मागणी करायची आहे. त्यानंतर त्यांना जवळच्या एसटीपी प्रकल्पातून पाणी मिळणार आहे.

हे लक्षात घ्या…

  • अ‍ॅपवर पाण्याची मागणी करताना नागरिकांना किंवा बांधकाम व्यावसायिकांना पाणी कशासाठी हवे आहे, याची नोंद करावी लागेल.
  • अ‍ॅपवर नोंदणी केल्यानंतर जवळच्या एसटीपी केंद्र आणि टँकरधारकांचे संपर्क नंबर येतील.
  • फोन करून टँकरच्या वाहतुकी रक्कम निश्चित करावी लागेल.
  • स्वतःचा टँकर घेऊन येणार्‍यांना प्रक्रिया केलेले पाणी मोफत मिळेल.
  • या सर्व प्रक्रियेचा मेसेज टँकरचालक, संबंधित व्यक्ती/नागरिक व एसटीपी केंद्राला जाईल.

प्रक्रिया केलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त वापर बांधकाम, बागकाम, झाडे व इतर कारणांसाठी करावा, यासाठी 'पीएमसी एसटीपी वॉटर टँकर सिस्टीम' नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. नागरिकांनी व बांधकाम व्यावसायिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून या सुविधेचा लाभ घ्यावा.

              – श्रीनिवास कंदुल, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महापालिका.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news