Crypto Currency : ‘क्रिप्टो’चा भूलभुलैया

Crypto Currency : ‘क्रिप्टो’चा भूलभुलैया

जगभरात वेगाने डिजिटायजेशन होत असताना क्रिप्टो चलनाच्याप्रसाराला रोखण्यास मर्यादा येत आहेत. भारतासह अनेक देशांत आजही क्रिप्टो करन्सीबाबत फारशी माहिती नाही किंवा अनेक जण अनभिज्ञ आहेत. तरीही क्रिप्टोच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले असून, त्यास वेळीच चाप बसविण्याची गरज आहे. काही देशांत नवीन कायदे आणि नियम तयार करण्यात आले आहेत. कायदाच क्रिप्टो बाजारात स्थैर्य आणू शकतो.

डिजिटल व्यवहारात फसवणूक होत असताना, आता ठकसेन अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या क्रिप्टोमार्फत कमी काळात अनेकपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत लोकांना फसवत आहेत. क्रिप्टोच्या माध्यमातून बळी पडलेले बहुतांश नागरिक हे शिक्षित आणि उच्चविद्याविभूषितही आहेत. क्रिप्टोमार्फत फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी आणि नेटवर्क सक्रिय आहे. त्यांचे म्होरके चीनमधील शहरात किंवा दुबईत बसून लोकांना फसवण्यासाठी रोज नवनवीन क्लृप्त्या लढविताना दिसतात. यासाठी टेलिग्राम किंवा व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपचा वापर केला जात आहे. चीनमधील लोकांना क्रिप्टोमार्फत फसवणूक होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कामगाराचे कमी वेतन. तसेच बेरोजगारीचे वाढते प्रमाणही त्यास कारणीभूत आहे.

क्रिप्टो करन्सीतील ठग हे प्रारंभी अ‍ॅप किंवा पोर्टलवर गुंतवणूकदारांना खाते सुरू करण्यास सांगतात. सुरुवातीला गुंतवणुकीची रक्कम ही जुजबी ठेवतात. ती अगदी कमी काळात दुप्पट आणि तिप्पट केली जाते. गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकल्यानंतर त्यांना मोठी रक्कम भरण्यास सांगितले जाते. अशा रीतीने सापळ्यात अडकलेला गुंतवणूकदार त्यांच्या विश्वासावर पैसे जमा करतो; पण ठग मंडळींच्या डोक्यात वेगळेच शिजत असते. ते गुंतवणूकदारांचे पैसे लीलया पद्धतीने अन्य खात्यांत वळते करतात किंवा होल्ड करतात. त्यानंतर लाटलेली रक्कम ही परदेशात पाठविली जाते.

भारताच्या अर्थमंत्रालयाने बायनेससह अनेक दोषी क्रिप्टोे एक्स्चेंजला या फसवणुकीबाबत नोटिसा बजावल्या आहेत. फसवणूक करण्यासाठी वापरण्यात येणारे यूआरएल ब्लॉक करण्याच्या द़ृष्टीने सरकारकडून काम केले जात आहे. जागतिक 'ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म चेन अ‍ॅनालिसीस'च्या मते, क्रिप्टो करन्सी व्यवहारात अमेरिकेनंतर ब्रिटन, तुर्कीये आणि रशियाला मागे टाकत भारत हा आता दुसरा मोठा बाजार ठरला. भारतात क्रिप्टो करन्सीचे क्वाईनडीसीएक्स, क्वाईनस्वीच, वजीरएक्स, बायकूकॉईन, जेबपे, गियोट्स, उनोकॉईन आदी एक्स्चेंज सक्रिय आहेत. भारतात आता क्रिप्टोमार्फत सायबर गुन्हेगारी, डिजिटल फसवणूक, टेरर फायनान्स, काळा बाजार, हवाला यांसारख्या गोष्टीदेखील घडवून आणल्या जात आहेत. क्रिप्टो करन्सीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बेकायदा वस्तू खरेदी करण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. क्रिप्टो करन्सी हे एक डिजिटल स्वरूपातील चलन असून, ते भौतिक रूपात उपलब्ध नसते. एखाद्या टांकसाळीत त्याची निर्मिती होत नाही. त्यामुळे त्याचा व्यवहार हा अन्य चलनाप्रमाणे कायदेशीर नसतो.

बदलत्या काळात सरकर क्रिप्टोवर अंकुश बसविण्यासाठी आणि ते नियमानुसार चलनात येण्यासाठी अन्य मार्गांचा शोध घेत आहे. काही देशांत नवीन कायदे आणि नियम तयार करण्यात आले आहेत. म्हणून कायदाच क्रिप्टो करन्सीच्या बाजारात स्थैर्य आणू शकतो आणि त्याला वैधता देण्याचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी साहाय्यभूत ठरू शकतो. आज डिजिटायजेशनबरोबरच क्रिप्टोेने फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढले आहे आणि त्याची वसुली होण्याचे प्रमाणही खूपच कमी आहे. ऑनलाईन फसवणुकीला अशिक्षित लोक सहजपणे बळी पडत आहेत. मात्र, चिंताजनक बाब म्हणजे या जाळ्यात अडकणार्‍यांत शिक्षित लोकांची संख्या अधिक आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news