मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत मार्च महिन्याच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये एकाच खासगी बँकेच्या किमान ५० ग्राहकांची एका लिंकच्या माध्यमातून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसवणूक झालेल्यांमध्ये अभिनेत्री मालविका उर्फ श्वेता मेनन (४३) हिचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक झालेल्या ग्राहकांना 'प्रिय ग्राहक, तुमचे बँक खाते ब्लॉक करण्यात आले आहे. कृपया तुमचे पॅनकार्ड अपडेट करा', अशा संदेशासोबत एक लिंक पाठविण्यात आली होती. त्यामुळे ग्राहकांनी पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून पैसे गेले. फेब्रुवारीच्या अखेर ते ३ मार्च या काळात मुंबईतील स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये ४० आणि सायबर पोलीस ठाण्यात १० असे एकूण ५० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बँक फसवणुकीच्या मेसेजला बळी पडल्यानंतर सायबर ठगांनी श्वेता आणि तिच्या मुलाच्या दोन खात्यांमधून ५७ हजार ६०० रुपये ऑनलाईन लंपास केले होते. श्वेताने गुरुवारी याबाबत बँकेत आणि त्यानंतर खार पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तिच्या मोबाईलवर मेसेज आला. खाते बंद होईल म्हणून घाबरून तिने लिंकवर क्लिक केले. पॅन कार्ड क्रमांक, नेट बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर तिला एका व्यक्तीचा कॉल आला ज्याने तो बँक टेलिकॉलर असल्याचा दावा केला होता. त्याने बोलण्यात गुंतवून ठेवत श्वेताकडून मोबाईलवर आलेले दोन ओटीपी घेत तिचे बैंकिंग तपशील चोरले आणि खात्यातून रक्कम लंपास केली.