कोल्हापूर : उदंड जाहले भोंदू… म्हणे, आम्ही नामी वैदू!

कोल्हापूर : उदंड जाहले भोंदू… म्हणे, आम्ही नामी वैदू!
Published on
Updated on

कोल्हापूर; सुनील कदम : कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणपट्टा आयुर्वेदिक किंवा देशी औषधांसाठी प्रसिद्ध आहे. कित्येक वर्षांपासून पारंपरिक ज्ञानाच्या आणि अभ्यासाच्या जोरावर आयुर्वेदिक औषधांचा पिढीजात व्यवसाय करणारी अनेक नामवंत घराणी आणि व्यावसायिक या भागात आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण राज्यभरातच आयुर्वेदिक किंवा देशी औषधांच्या नावाखाली बनवाबनवीचा खेळ सुरू झालेला दिसत आहे. त्याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.

चार दिवसांपूर्वी मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध खाल्ल्यानंतर पती-पत्नीचा तडकाफडकी मृत्यू झाल्याची घटना कोल्हापूरनजीकच्या वडणगे या गावात घडली आहे. थोड्याफार अंतराने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात अशाच किंवा वेगळ्या प्रकारच्या घटना घडताना दिसत आहेत. अशा स्वरूपाच्या घटना म्हणजे आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली काही भोंदू वैद्यांनी मांडलेल्या गोरखधंद्याचा परिपाक आहे.

गेल्या काही वर्षांत जगभरामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धती आणि वनौषधीला मोठ्या प्रमाणात मान्यता मिळताना दिसत आहे. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या जंगलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 315 वनस्पती या वनौषधी आढळून येतात. स्थानिक लोक पारंपरिक ज्ञानाच्या आधारावर या वनौषधींचा औषधी आणि व्यावसायिक वापर करताना दिसतात. आयुर्वेदिक औषधांच्या जगन्मान्यतेमुळे गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवरील वनौषधींच्या व्यापारामध्ये चारशे पटीने वाढ झालेली आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर गेल्या दहा वर्षांमध्ये वनौषधींच्या दरात तब्बल 700 पटीने वाढ झाली आहे. देशांतर्गत वनौषधींची निर्यातही वार्षिक साडेचारशे कोटी रूपयांवर गेलेली आहे.

वनौषधी किंवा आयुर्वेदिक औषधांना जगभर लाभत असलेल्या या जनाधाराचा गैरफायदा घेण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील अनेक गावांमध्ये भोंदू आयुर्वेदिक वैदू मंडळींचे उदंड पिक फोफावलेले दिसत आहे. वनौषधी किंवा आयुर्वेदिक औषधांमधील काडीइतकेही ज्ञान नसलेल्या हजारो लोकांनी अगदी गल्लीबोळात देशी, वनौषधी किंवा आयुर्वेदिक औषधांची दुकाने थाटलेली दिसत आहेत. कोल्हापूर किंवा कोकण पट्टा भागातील स्थानिक लोकांकडून कसल्यातरी वनौषधी गोळा करायच्या आणि सांगिवांगी ज्ञानावर त्याचा बाजार मांडायचा, असा या मंडळींचा धंदा आहे. कोण कसल्या आजारावर कसलं तरी रंगीत पाणी देतो, कोण कसल्यातरी झाडाची पानं, फुलं, साली किंवा मूळं देतो, कोण कसलं तरी चुर्ण देवून कोणताही रोग समूळ नष्ट करण्याचा दावा करतो, तर आणखी कुणाचं काय तर कुणाचं काय, असा सगळा खेळखंडोबा सुरू असलेला दिसत आहे. या भोंदू वैदूबाबांवर ना कुणाचा धाक की ना कुणाचं नियंत्रण, त्यामुळे बिनबाभाटपणे यांची दुकानदारी चाललेली दिसत आहे.

आजकाल वैद्यकीय व्यवसायातील कटप्रॅक्टीसच्या खेळामुळे दवाखान्याची पायरी चढणे गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे अशी मंडळी सहजासहजी या भोंदू वैदू मंडळींच्या जाळ्यात अडकतात आणि फशी पडतात. शिवाय या भोंदू वैदूंकडून उपायाऐवजी कोणता अपाय झाला तरी कुणाकडे दादही मागायची सोय रहात नाही. त्यामुळे शासनानेच आता गावागावी देशी, वनौषधी किंवा आयुर्वेदिक औषधांची दुकानं थाटून बसलेल्या या भोदू वैदूंचे कंबरडे मोडून काढण्याची आवश्यकता आहे.

राज्यात 80 हजारांवर आयुर्वेदिक डॉक्टर!

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनकडे असलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 80 हजारांहून अधिक आयुर्वेदिक आणि युनानी उपचार करणारे डॉक्टर आहेत. विशेष म्हणजे, यापैकी जवळपास 20 हजार आयुर्वेदिक डॉक्टरांनी आपल्या वैद्यकीय व्यवसाय परवान्यांचे वेगवेगळ्या कारणांनी नूतनीकरणच केलेले नाही. नूतनीकरण न करण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण धक्कादायक आहे, ते म्हणजे त्यांचा वैद्यकीय व्यवसायच चालत नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून आयुर्वेदिक औषधोपचाराची पदवी घेतली आहे, त्यांचे व्यवसाय चालत नाहीत आणि दुसरीकडे भोंदू वैदूंची दुकाने मात्र तेजीत चालताना दिसतात, हा एक विरोधाभासच समजायला पाहिजे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news