कोल्हापूर : दामदुपटीच्या आमिषाने कोटीचा गंडा; जीएसटी अधिकार्‍यासह 5 जणांना अटक

कोल्हापूर : दामदुपटीच्या आमिषाने कोटीचा गंडा; जीएसटी अधिकार्‍यासह 5 जणांना अटक
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीच्या रकमेवर सुरुवातीला दरमहा साडेचार टक्के व्याज, 12 महिन्यांनंतर 54 टक्के तसेच 24 महिन्यांनंतर मूळ रक्कम परत अशा फसव्या योजनेच्या सापळ्यात अडकलेल्या कोल्हापूर, सांगलीसह कर्नाटकातील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणार्‍या गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीच्या म्होरक्यासह 9 जणांविरुद्ध मंगळवारी राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. कंपनीचा म्होरक्या आणि प्रमोटर असलेल्या जीएसटी अधिकार्‍यांसह पाचजणांना अटक करण्यात आली आहे.

वार्षिक 54 टक्के व्याज आणि दोन वर्षांत मुद्दल परत देणार असे आमिष दाखवून म्होरक्यासह साथीदारांनी गुंतवणूकदारांना कोट्यवधीचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. म्होरक्या इंद्रजित कदम व कंपनीचा प्रमोटर तथा जीएसटी अधिकारी कुमार उबाळे याने चौकशीत 30 ते 35 कोटींच्या फसवणुकीची कबुली दिली असली तरी सुमारे 300 ते 350 कोटींच्या आसपास ही रक्कम असावी, अशी शक्यताही तपास अधिकार्‍यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

विजया दीपक कांबळे (रा. प्रताप भोसलेनगर, सरनोबतवाडी, ता. करवीर) यांच्या फिर्यादीनुसार आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी ही कारवाई केली. कंपनीचा म्होरक्या इंद्रजित सुभाष कदम (46, रा. प्रतिभानगर), प्रमोटर व जीएसटी अधिकारी कुमार जोतिराम उबाळे (52, राजेंद्रनगर), राहुल शशिकांत गाडवे (52, सातवी गल्ली, राजारामपुरी), अमरदीप बाबूराव कुंडले (49, राजगड कॉलनी, कोल्हापूर), आबासो बाळू वाडकर (47, मणेर मळा, उचगाव, करवीर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

संशयित अतुल वाघ (देवकर पाणंद), शैलेश वाघ (फुलेवाडी), शैलेश मरगज (शिवाजी पेठ), सुनीता आबासो वाडकर (मणेर मळा, उचगाव) अशी पसार झालेल्या अन्य संचालकांची नावे आहेत. संबंधितांना लवकरच अटक करण्यात यश येईल, असेही तपासाधिकारी कळमकर यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यातही फसवणुकीची व्याप्ती

कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे जिल्ह्यांसह गोवा व कर्नाटकातही फसवणुकीची व्याप्ती असल्याचे कळमकर म्हणाले. प्राथमिक चौकशीत संशयितांनी 26 गुंतवणूकदारांची एक कोटी 11 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी कागदपत्रांसह संपर्क साधावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.

दामदुप्पट नव्हे, तर तब्बल तिपटीने परतावे, परदेशी सहलीचेही आमिष

म्होरक्या इंद्रजित कदम आणि कंपनीचा प्रमोटर तथा जीएसटी अधिकारी असलेल्या कुमार उबाळे व संचालकांनी राजारामपुरी येथील तिसर्‍या गल्लीत गोल्ड लाईफ डिस्ट्रिब्युटर्स कंपनीचे ऑगस्ट 2022 मध्ये कार्यालय थाटले. कमी कालावधीत दुप्पट, तिप्पट दराने जादा परतावा तसेच गुंतवणुकीवर परदेशी सहल, शिवाय आकर्षक भेटवस्तूंच्या बहाण्याने शहर, जिल्ह्यासह परिसरातील गुंतवणूकदारांकडून मोठमोठ्या रकमा भरून घेतल्या.

एजंटांनी केला कंपनीचा बोलबोला

विनासायास आणि अन्य कंपन्यांच्या तुलनेत भरपूर परतावा मिळण्याच्या आशेने गुंतवणूकदारांनीही मोठ्या प्रमाणात कंपनीकडे गुंतवणूक केली. कंपनीने सुरुवातीच्या काळात गुंतवणूकदारांना दरमहा साडेचार टक्के, 12 महिन्यांनंतर 54 टक्के व्याज दराने रकमांची पूर्तता केली. शिवाय कमिशनवर नेमलेल्या एजंटांच्या साखळीने कंपनीच्या व्यवहाराबाबत बोलबाला केल्याने गुंतवणुकीसाठी कार्यालयासमोर गर्दी असे.

परतावे रोखल्याने सार्‍याचेच धाबे दणाणले

कंपनीने मार्च 2023 पासून गुंतवणूकदारांना परतावा देण्याचे बंद केल्यानंतर सार्‍यांचेच धाबे दणाणलेे. मूळ मुद्दलसह परताव्याची रक्कम मिळण्यासाठी गुंतवणूकदारांचा तगादा सुरू होता. मात्र संशयितांनी टाळाटाळ सुरू केल्यानंतर फिर्यादी विजया कांबळे यांच्यासह गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेऊन तक्रारी दाखल केल्या. पंडित यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक कळमकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली.

आलिशान कार्यालयाची झाली विक्री?

इंद्रजित कदम, कुमार उबाळे यांनी राजारामपुरी येथील तिसर्‍या गल्लीत आलिशान कार्यालय थाटले होते. कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर त्यांनी कार्यालयाचीही विक्री केल्याची माहिती आहे. याबाबत चौकशी करीत असल्याचे तपासाधिकारी कळमकर यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news