राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब फडके यांचे निधन

राष्ट्रवादीचे माजी प्रदेश सरचिटणीस नानासाहेब फडके यांचे निधन
खोर(ता. दौंड); पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेश सरचिटणीस, कात्रज दूध संघाचे माजी संचालक नानासाहेब फडके यांचे गुरुवारी (दि. ६) रात्रीच्या दरम्यान हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. याबाबत माहिती अशी की, गुरुवारी रात्री उशीरा नानासाहेब फडके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना केडगाव येथील खासगी दवाखान्यात हलवण्यात आले, मात्र त्यांची तब्येत नाजूक झाल्याने त्यांना पुढे लोणी काळभोर येथे हॉस्पिटलमध्ये हलविण्यास सांगितले. उपचारादरम्यान फडके यांना मृत घोषित करण्यात आले.
नानासाहेब फडके यांनी भीमा सहकारी साखर कारखाना व कात्रज दूध संघावर पाच वर्ष संचालक पद सांभाळले आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाचा खंदा समर्थक व माजी आमदार रमेश थोरात यांचे विश्वासू सहकारी म्हणून फडके यांची ओळख होती. त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. हातवळणचे माजी सरपंच व दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापाती सागर फडके व हातवळणचे विद्यमान सरपंच योगेश फडके यांचे ते वडील आहेत. नानासाहेब फडके यांच्या निधनाने दौंड तालुक्यात शोककळा पसरली आहे.
नानासाहेब फडके यांच्या पार्थिवावर भीमा नदी काठी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे दौंड तालुकाध्यक्ष अप्पासाहेब पवार, पुणे जिल्हा राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे, भाजप किसान मोर्च्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे, कात्रज दूध संघाचे उपाध्यक्ष राहूल दिवेकर, रामभाऊ टूले, लक्ष्मण दिवेकर तसेच मोठ्या संख्येने दौंड तालुक्यातून ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news