Bishan Singh Bedi Passed Away : माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन

Bishan Singh Bedi Passed Away : माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचे निधन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bishan Singh Bedi Passed Away : भारतात सध्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा सुरू असताना वाईट बातमी समोर आली आहे. भारताचे माजी दिग्गज फिरकीपटू बिशनसिंग बेदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व

बिशनसिंग बेदी यांचा जन्म 25 सप्टेंबर 1946 रोजी अमृतसर येथे झाला होता. ते डावखुरे गोलंदाज होते. 1966 ते 1979 या काळात त्यांनी भारताकडून कसोटी क्रिकेट खेळले. यादरम्यान त्यांनी 22 कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्वही केले आहे. आपल्या 12 वर्षांच्या कसोटी करिअरमध्ये बेदी यांनी 67 सामन्यांत 266 विकेट घेतल्या. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 370 सामन्यांमध्ये 1,560 विकेट घेतल्या. तसेच त्यांनी 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. भारताच्या पहिल्या एकदिवसीय विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या कोलकाता कसोटी पदार्पण

बिशनसिंग बेदी यांनी 31 डिसेंबर 1966 रोजी कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली. हा सामना 31 डिसेंबर 1966 ते 5 जानेवारी 1967 या कालावधीत खेळला गेला. त्या सामन्यात बेदींना फक्त एका डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. ज्यात त्यांनी दोन विकेट घेतल्या. तर द ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. हा सामना 30 सप्टेंबर ते 4 सप्टेंबर 1979 या कालावधीत खेळला गेला.

बेदी यांनी पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै 1974 रोजी लॉर्ड्स येथे इंग्लंड विरुद्ध खेळला गेला, आणि शेवटचा एकदिवसीय सामना 16 जून 1979 रोजी मँचेस्टर येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला गेला. भारतीय संघाव्यतिरिक्त, पंजाबसाठी क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात करणारे बेदी यांनी आपला बहुतांश वेळ दिल्लीच्या रणजी संघात घालवला, ज्यात ते 1968 मध्ये सामील झाले होते.

स्पिनर चौकडीचा दबदबा

1970 च्या दशकात फिरकी गोलंदाजीच्या प्रसिद्ध चौकडीचा बेदी हे अविभाज्य घटक होते. त्या चौकडीमध्ये इरापल्ली प्रसन्ना, श्रीनिवास वेंकटराघवन आणि भागवत चंद्रशेखर हे दिग्गज फिरकीपटू होते. या चौघांचा दबदबा इतका होता की अनेक मोठे मोठे फलंदाजांनी त्यांच्यापुढे लोटांगण घातले. बेदी, प्रसन्ना, वेंकटराघवन आणि चंद्रशेखर या चौघांनी मिळून 231 कसोटी सामने खेळले आणि 853 बळी घेतले.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी

बेदी यांनी 1969-70 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता कसोटीत एका डावात 98 धावांत सात विकेट घेतल्या होत्या. ही त्याची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर 1977-78 मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 194 धावांत एकूण 10 विकेट्स घेतल्या होत्या. 1976 मध्ये कानपूर कसोटीत त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध कसोटीतील एकमेव अर्धशतक झळकावले होते.

पतौडी यांच्या जागी बेदी कर्णधार

बिशनसिंग बेदी यांनाही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. 1976 मध्ये त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. महान क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्या जागी बेदी यांना कर्णधार बनवण्यात आले. कर्णधार म्हणून त्यांचा पहिला विजय 1976 च्या दौऱ्यात पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध मिळाला होता. यानंतर, मायदेशात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-1, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिकेत 3-2 आणि पाकिस्तान दौऱ्यावरील कसोटी मालिकेत 2-0 अशा फरकाने भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर बेदी यांना कर्णधारपदावरून दूर करण्यात आले आणि सुनील गावस्कर यांच्याकडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news