मडगाव ; पुढारी वृत्तसेवा : माजी मुख्यमंत्री आणि मडगाव मतदारसंघाचे गोवा काँग्रेसचे जेष्ठ आमदार दिगंबर कामत येत्या दोन दिवसांत काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करणार असल्याचे खात्रीदायक वृत्त आहे. मडगावमधील भाजपच्या कार्यकर्त्यांना त्याबाबत पक्षश्रेष्ठींनी सूचित केले आहे. दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेससाठी तो मोठा धक्का ठरणार आहे.
विधिमंडळ नेते निवडतांना पक्षश्रेष्ठीनी विश्वासात न घेतल्याने कामत पक्षावर नाराज आहेत. नुकतेच त्यांच्या कार्यकर्त्यांची मडगाव येथे बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीत मोलाची कामगीरी बजावून सुद्धा पक्षाने प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेता निवडताना कामत यांना विश्वासात घेतले नव्हते. त्यांना या दोन्ही पदांच्या निवडीबद्धल एका पत्राद्वारे कळविण्यात आले . कामत यांना बाजूला ठेवून पक्षाने हे महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे पडसाद मडगावातील त्या बैठकीत उमटले होते.
कामत यांनी पक्षाला सोडचिठ्ठी द्यावी, अशी मागणीही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली होती. गेले दोन दिवस कामत यांच्या राजीनाम्याची चर्चा राज्यभर सुरू होती. कामत यांनीही आपण काँग्रेस सोडणार नाही असे स्पष्ट केले होते;पण बुधवरी झालेल्या अत्यंत महत्वपूर्ण घडामोडीत कामत यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
मडगावच्या भाजप मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर बोलतांना सांगितले की, येत्या दोन दिवसांत दिगंबर कामत भाजपमध्ये प्रवेश करतील. वरीष्ठ पातळीवर त्यांना भाजपात घेण्यासाठी जोरदार हालचाली सुरु झालेल्या आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावर यांना दिगंबर कामत यांच्यांविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
दिगंबर कामत यांच्याकडून आजगावकरांचा दारुण पराभव झाला होता. सातत्याने मडगावात निवडून येणाऱ्या दिगंबर कामत यांनी काँग्रेसच्या राजवटीत मुख्यमंत्री, विजमंत्री अशी महत्त्वपूर्ण खाती सांभाळलेली आहेत. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा यासाठी यापूर्वी अनेक वेळा भाजप पक्षश्रेष्ठींकडून प्रयत्न झाले होते. पण यंदा काँग्रेसची राज्यात झालेली वाताहात आणि विधिमंडळ नेते निवडताना पक्षाने विश्वासात न घेतल्याच्या कारणामूळे नाराज झालेल्या कामत यांनी भाजपच्या प्रस्तवाला हिरवा कंदील दाखवल्याचे समजते.
दिगंबर कामत यांचे कट्टर समर्थक आणि मडगाव पालिकेचे जेष्ठ नगरसेवक दामू शिरोडकर यांनी 'पुढारी'बराेबर बोलताना कामत यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे सांगितले. दहा वर्ष आम्ही विरोधात आहोत.लोकांची कामे होणे आवश्यक आहेत. राज्यभरातील जनतेच्या दिगंबर कामत यांच्यांकडून भरपूर अपेक्षा आहेत. भाजपमध्ये यांच्या जेष्ठतेनूसार पद मिळाल्यास त्यांनी ते आवश्य स्वीकारावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे दामू शिरोडकर म्हणाले.
कामत हे एकमेव काँग्रेसचे आमदार आहेत ज्यांनी आजपर्यंत अनेक ऑफर्स धुडकावून पक्षाबरोबर प्रामाणिक राहीले आहेत. आठ हजार मताधिक्य घेऊन ते मडगाव निवडून आले आहेत.काँग्रेस पक्षाने विरोधीपक्ष नेते आणि प्रदेशाध्यक्ष निवडतांना त्यांना विश्वासात घेणे गरजेचे होते. असे ते म्हणाले.