गोवा : आज प्रमोदची आई हवी होती! मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे भावूक उद्गार | पुढारी

गोवा : आज प्रमोदची आई हवी होती! मुख्यमंत्र्यांच्या वडिलांचे भावूक उद्गार

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्याचे चौदावे मुख्यमंत्री म्हणून डॉ. प्रमोद सावंत यांनी काल (दि.२८) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत इतर आठ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा अभूतपूर्व असाच झाला. गोव्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. दहा ते बारा हजार लोकांच्या उपस्थितीत डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर संपन्न झालेल्या या विजयोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वडील, पत्नी, मुलगी आणि इतर कुटुंबीय सहभागी झाले होते.

काही वर्षांपूर्वी डॉ. प्रमोद सावंत यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. या प्रसंगी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे वडील माजी जिल्हा पंचायत सदस्य पांडुरंग सावंत यांनी आपल्या पत्नीची तथा मुख्यमंत्र्यांच्या आईची यावेळी प्रकर्षाने आठवण होत असल्याचे सांगितले. या आनंदी क्षणी प्रमोदची आई उपस्थित हवी होती. असे भावूक उद्गार त्यांनी यावेळी काढले.

आपण जनसंघाचा कार्यकर्ता म्हणून व त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे काम करत असताना जिल्हा पंचायतीवर निवडून आलो. डॉ. प्रमोद सावंत यास बालपणापासूनच समाजसेवेची आवड होती. विविध संघटनेच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा सुरू केली. डॉक्टरी केली आणि सरकारी नोकरीलाही लागलो होते. मात्र, माजी मुख्यमंत्री तथा माजी संरक्षण मंत्री पद्मभूषण मनोहर पर्रीकर यांनी आमच्या घरामध्ये येऊन प्रमोद यांना नोकरी सोडावी लागणार आहे. त्याने राजकारणात उतरायला हवं. असं सांगितलं . प्रमोदने मला विचारलं बाबा काय करू? मी त्याला होकार दिला. मनोहर पर्रीकर यांच्या एका शब्दाखातर प्रमोदने सरकारी नोकरी सोडली आणि राजकारणात दाखल झाला. विविध माध्यमातून समाजसेवा करत- करत सुरुवातीला सभापती आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री असे यश मिळवले.

२०१९ मध्ये पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर अचानकपणे प्रमोदला मुख्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तो काळ फारच गुंतागुंतीचा होता. मनोहर पर्रीकर यांचे निधन झालं होतं. त्यामुळे तो दुःखाचा प्रसंग होता. अशा वेळी मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतरही आनंदोत्सव साजरा करता आला नव्हता. मात्र, यावेळी गेल्या तीन वर्षात प्रमोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाच्या बळावर प्रमोद याच्या नेतृत्वाखाली गोव्यामध्ये निवडणुकीत भाजपने यश मिळवले. तब्बल २० जागी कोणत्याही पक्षाशी युती न करता विजय मिळवला. त्यामुळे हे यश निश्चित यशदायी आहे. असे पांडुरंग सावंत म्हणाले.

अनेक आव्हाने समोर आहेत. मात्र, आव्हानाचा मुकाबला करणं आणि त्यावर तोडगा काढणं त्याला आवडतं. कोरोना महामारीच्या काळात त्याने केलेले काम आपण पाहिलं आहे. गोव्याने पाहिले आहे. गोवेकरांनी जो विश्वास त्याच्यावर दर्शवला आहे त्याला निश्चित प्रमोद खरा उतरेल. असे यावेळी पांडुरंग सावंत यावेळी म्हणाले.

सर्वसामान्यांपर्यंत विकासाची फळे पोहोचतील

आपल्यासाठी हा फारच आनंददायी क्षण असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पत्नी प्राध्यापिका सुलक्षणा सावंत यांनी यावेळी सांगितले. मागील वेळी ते मुख्यमंत्री झाले तेव्हा ते अचानक घडलेल्या घटनेमुळे झाले होते. मात्र, यावेळी पद कष्टाने मिळवलेलं आहे. लोकांनी बहाल केलेलं मुख्यमंत्रीपद आहे. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्रीपदाला विशेष महत्त्व असल्याचेही त्या म्हणाल्या.

भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांचा पक्ष. शिस्तबद्ध संघटना आणि पक्षाचे निस्सीम व निस्वार्थी कार्यकर्ते हेच आमच्या पक्षाचे बळ आहे. आणि त्यांच्या जिवावरच गोव्यात भाजपला बहुमत मिळाले आहे. पुढील पाच वर्षांमध्ये आपले पती डॉक्टर सावंत हे मुख्यमंत्री म्हणून निश्चितच चांगले काम करतील. तळागाळातील लोकांसाठी योजना राबवून सर्वसामान्यांपर्यंत अंत्योदय तत्त्वावर विकासाची फळे पोहोचतील. असा विश्‍वास यावेळी प्राध्यापिका सावंत यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का? 

Back to top button