बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी (वय ७२) यांचे आज (दि.१४) निधन झाले. सुशील मोदी हे बिहारमधील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक होते. ते कर्करोगाने त्रस्त होते. बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री, सम्राट चौधरी यांनी एक्स'वर पोस्ट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली.

  • 'बिहार भाजपचे संकटमोचक' असे सुशील मोदी यांना म्हटले जात होते.
  • लालूप्रसाद यादव हे एकेकाळी भाजपच्या जवळचे होते, त्यात सुशील कुमार मोदी यांची भूमिका महत्वाची मानली जात होती.
  • मुख्यमंत्री नितीशकुमार प्रत्येक वेळी भाजपच्या जवळ येण्याचे कारणही सुशील मोदीच होते.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुशील कुमार मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
  • मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक सच्चा मित्र गमावल्याचे म्हणत दु:ख व्यक्त केले आहे.

सुशील कुमार मोदी गेल्या सहा महिन्यांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांनी ३ एप्रिल रोजी त्यांच्या एका एक्स-पोस्टमध्ये स्वतःला कर्करोग झाल्याची माहिती दिली होती. त्यांच्या निधनाची माहिती बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दिली. सुशील कुमार मोदी यांचा जन्म ५ जानेवारी १९५२ रोजी बिहारची राजधानी पाटणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल मोदी आणि आईचे नाव रत्ना देवी होते. त्यांची पत्नी जेसी सुशील मोदी ख्रिश्चन धर्माच्या असून त्या प्राध्यापक आहेत. त्यांना दोन मुले आहेत.

१९९० मध्ये पहिल्यांदा आमदार

सुशील कुमार मोदी यांनी पाटणा सायन्स कॉलेजमधून बॉटनीमध्ये पदवी मिळवली आहे. १९९० मध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर १९९५ आणि २००० मध्येही ते आमदार झाले. ते सलग तीन वेळा आमदार होते.

बिहारमध्ये भाजपच्या उदयात अमूल्य योगदान : पंतप्रधान

सुशील कुमार मोदी यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले आहे की, 'पक्षातील माझे बहुमोल सहकारी आणि अनेक दशकांपासून असलेले माझे मित्र सुशील मोदीजी यांच्या अकाली निधनाने मला खूप दुःख झाले आहे. बिहारमध्ये भाजपच्या उदय आणि यशात त्यांचे अमूल्य योगदान आहे. आणीबाणीला कडाडून विरोध करत त्यांनी विद्यार्थी राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण केले होते. अत्यंत कष्टाळू आणि मनमिळाऊ आमदार म्हणून त्यांची ओळख होती. राजकारणाशी संबंधित विषयांची त्यांची समज खूप खोल होती. प्रशासक म्हणूनही त्यांनी खूप कौतुकास्पद काम केले. जीएसटी मंजूर करण्यात त्यांची सक्रिय भूमिका कायम स्मरणात राहील. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह माझ्या संवेदना आहेत, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून शोक व्यक्त

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून सुशील मोदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. "भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांच्या निधनाचे वृत्त समजले. भाजप परिवार आणि संघटनेसाठी ही कधीही भरून न येणारी हानी आहे. तुमचे जीवन गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आणि मागासलेले आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत" असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news