आजरा : हत्तीच्या हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू

आजरा : हत्तीच्या हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू
Published on
Updated on

आजरा, पुढारी वृत्तसेवा : घाटकरवाडी (ता. आजरा) जवळील जंगलात टस्कर हत्तीने अचानक केलेल्या हल्ल्यात वनमजूर प्रकाश गोविंद पाटील (वय 54, रा. गवसे, ता. आजरा) यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. दरम्यान, वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गवसे परिसरातील नागरिकांनी आजरा ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ठिय्या मांडत, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांनी याबाबत बैठक घेऊ व पाटील कुटुंबीयांना योग्य ती नुकसानभरपाई देण्याची ग्वाही दिल्यानंतर तणाव निवळला.

गेल्या पंधरा दिवसापासून टस्कर घाटकरवाडी परिसरात तळ ठोकून होता. या कालावधीत अनेक शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शनिवारी सकाळी हत्तीबाधित क्षेत्रात धनगरमोळा परिमंडलाचे वनपाल भरत निकम, वनरक्षक गुरुनाथ नावगेकर, दीपक कदम, प्रियंका पाटील, वनमजूर रमेश पाटील, आनंदा सावंत, बबन फर्नांडिस, गंगाराम कोकरे, जगन्नाथ कोकरे, प्रकाश पाटील यांचे पथक नियमित जंगल फिरतीसाठी गेले होते. याचदरम्यान सुळेरान हद्दीतील माधवगिरी येथील कोंडीगोंड नावाच्या परिसराजवळ हत्ती झुडपामध्ये लपलेला होता. प्रकाश पाटील हे पुढे तर इतर कर्मचारी मागील बाजूस फिरती करत होते. झुडपात लपलेला टस्कर अचानक पथकाच्या समोर आला. त्याने प्रकाश पाटील यांच्यावर हल्ला करत त्यांना सोंडेमध्ये धरून दोन वेळा आपटले. त्यांच्या पोटावर पाय दिला. त्यामध्ये पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यानंतर टस्कर पुन्हा पथकातील अन्य कर्मचार्‍यांच्या मागे लागला. कर्मचार्‍यांनी जीव वाचवला. घटना समजल्यानंतर घाटकरवाडी व गवसे येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वनाधिकारी स्मिता डाके यांच्यासह कर्मचारीही दाखल झाले. पाटील यांना उपचारासाठी आजरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर गवसे व परिसरातील नागरिकांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. सुमारे पाचशेहून अधिक नागरिक रुग्णालयाच्या परिसरात जमा झाले होते. वन विभागाच्या हलगर्जीपणामुळेच पाटील यांना जीव गमवावा लागला आहे. याचा निषेध करत रुग्णालय आवारात ठिय्या आंदोलन केले. वन खात्याने हत्ती व अन्य वन्य प्राण्यांचा ठोस बंदोबस्त करण्याचे आश्वासन द्यावे असा आग्रह धरत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा दिला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आजर्‍याचे सहा. पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र जमाव ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हता. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठोस भूमिका जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. माहिती मिळताच जिल्ह्याचे उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद हे ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत बैठक घेणार असल्याचे सांगितले. यावेळी नागरिकांनी विविध प्रश्नांचा भडिमार करत उपवनसंरक्षक गुरुप्रसाद यांना धारेवर धरले. अधिकारी निरुत्तर झाले. नागरिकांच्या भावना वरिष्ठांना कळविणार असल्याचे तसेच पाटील कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितल्यानंतर जमाव शांत झाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news