कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जादा परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक करणार्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्ससह संलग्न कंपन्यांच्या आर्थिक व्यवहाराचे शनिवारपासून फॉरेन्सिक ऑडिट सुरू झाले आहे. पोलिस महासंचालकांच्या मंजुरीनंतर पुणे येथील प्रास असोसिएटस् कंपनीने तत्काळ ऑडिटचे काम सुरू केले आहे.
कोल्हापुरात पथक दाखल झाले असून कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहे. महिन्यात फॉरेन्सिक ऑडिटचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. असे आर्थिक गुन्हे अन्वेषणचे प्रभारी अधिकारी रवींद्र कळमकर यांनी सांगितले.
ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपर्स आणि संलग्न अन्य कंपन्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह अन्य राज्यातील दीड लाखापेक्षा अधिक गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केली आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये फसवणूकप्रकरणी कंपनीचा प्रमुख सूत्रधार लोहितसिंग सुभेदारसह 32 जणाविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषणमार्फत फसवणुकीचा तपास सुरू असून आजवर सुभेदारसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तपास पथकाने कंपनीच्या कार्यालयासह संशयिताच्या घरांची झडती घेऊन आर्थिक व्यवहाराची कागदपत्रे, बॅक खात्यांचे तपशील, लॅपटॉप, संगणक, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह ताब्यात घेतले आहेत.
फसवणुकीची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या कंपन्यांच्या व्यवहाराचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याचा निर्णय घेऊन पोलिस महासंचालकांकडे प्रस्ताव दाखल केला होता. महासंचालकांनी प्रस्तावाला तत्काळ मंजुरी दिली. त्यानुसार आज शनिवारपासून फॉरेन्सिक ऑडिटला सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले.
फसवणूकप्रकरणी पथकाने कंपनीचा सूत्रधार, संचालक, एजंटांना अटक केली आहे. त्यांच्या मालमत्ता गोठविण्यात येत आहेत. मालमत्तांच्या लिलावाची कायदेशीर प्रक्रियाही सुरू झाली आहे, असेही सांगण्यात आले.
चौकशीसाठी एजंटांना नोटिसा
ए. एस. ट्रेडर्सच्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख एजंटांना चौकशीसाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेत चौकशीसाठी हजर राहण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक करवीर, हातकणंगले, इचलकरंजीसह जयसिंगपूर, सांगली, मिरज परिसरातील एजंटांचा समावेश आहे.