क्रीडा : फुटबॉलसम्राट बेकनबॉर

क्रीडा : फुटबॉलसम्राट बेकनबॉर

बेकनबॉर हे फुटबॉल वर्तुळातील अतिशय प्रतिष्ठेचे नाव. बेकनबॉर यांनी ज्याप्रमाणे खेळाडू या नात्याने आपली कारकीर्द गाजवली, त्याचप्रमाणे निष्णात प्रशिक्षक म्हणूनही अवीट ठसा उमटवला. मूळचे जर्मन असलेल्या बेकनबॉर डेर कैसर अर्थात सम्राट या टोपण नावाने ओळखले जायचे. यावरूनच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उत्तम झलक दिसून येते. गत आठवड्यात या दिग्गज फुटबॉलपटूने भौतिक जगाला अलविदा केला. यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाची एक छोटीशी झलक!

जागतिक फुटबॉलचा विचार करता या खेळातील सर्वात महान खेळाडू व सर्वात महान प्रशिक्षकांपैकी एक म्हणून गणले जाणारे बेकनबॉर फुटबॉल इतिहासात दोनवेळा बॅलोन ओडोर पुरस्कार जिंकणारे एकमेव मिडफिल्डर! प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक शैलीचा पुरता बीमोड करत क्षणार्धात खेळाची सर्व समीकरणे उलथीपालथी करून टाकावीत ती बेकनबॉर यांनीच, असे म्हटले जायचे ते यासाठीच! आधुनिक फुटबॉलचे लिबेरो, हे बिरुद त्यांना यासाठीच अगदी सन्मानाने बहाल केले गेले. 1998 मध्ये 20 व्या शतकातील सर्वोत्तम संघातील समावेश आणि 2002 फिफा फुटबॉल सर्वोत्तम संघातील वर्णी ही त्यांच्या कारकीर्दीतील काही ठळक वैशिष्ट्ये. भले बेकनबॉर यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द त्यांच्या लौकिकाला न्याय देत असेल किंवा नसेल; पण क्लब स्तरावरील त्यांचे योगदान अर्थातच लक्षवेधी आणि तितकेच दखलपात्र होते, हेच खरे.

जर्मनीत आजवर खेळाडू व प्रशिक्षक या दोन्ही नात्यांनी फुटबॉलचे जगज्जेतेपद जिंकून देणे केवळ तीनच खेळाडूंना शक्य झाले आहे आणि त्यात बेकनबॉर यांचा प्राधान्याने समावेश होतो. बेकनबॉर यांनी 1974 मध्ये खेळाडू या नात्याने तर 1990 मध्ये मॅनेजर या नात्याने विश्वचषक जिंकून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. जर्मनीला 2006 मध्ये फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळवून देण्यातही त्यांचेच योगदान निर्णायक ठरले. पण, नंतर याच प्रकरणी लाचखोरीचे आरोप झाल्याने त्यांची प्रतिमा काही अंशी झाकोळलीही गेली.

2019 मध्ये बेकनबॉर यांनी लिव्हरपूलचे प्रशिक्षक जर्गेन क्लॉप यांची प्रशंसा केली, त्यावेळी क्लॉप यांना अक्षरश: आकाश ठेंगणे झाले होते. याच भावनेतून क्लॉप यांच्या तोंडून कौतुकोद्गार निघाले, आज मला राजाने नाईटवूड पदवी दिल्यासारखे भासते आहे! बेकनबॉर यांचा जन्म दुसर्‍या महायुद्धानंतरचा. पोस्टल कर्मचारी फ्रँक बेकनबॉर सीनियर यांचे ते सुपुत्र. जिएसिंगमध्ये त्यांची जडणघडण होत होती आणि आश्चर्य म्हणजे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी फुटबॉलचे धडे गिरवणे सुरू केले होते. बेकनबॉर प्रारंभिक टप्यात सेंटर फॉरवर्ड या पोझिशनवर खेळायचे. पण, नंतर 1954 च्या विश्वचषक जेत्या फ्रित्झ वॉल्टरपासून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या खेळात, शैलीत, तंत्रात बरेच व्यापक फेरबदल केले आणि याचा त्यांना भविष्यातील वाटचालीत बराच फायदा झाला.

1959 मध्ये बेकनबॉर यांनी म्युनिच हा पसंतीचा संघ असतानाही बायर्नच्या युवा संघात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि योगायोगाने हेच दोन्ही संघ 14 वर्षांखालील वयोगटातील एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आमनेसामने भिडले. आता बेकनबॉर हेच बायर्नचे तारणहार होते आणि त्यांना रोखण्यासाठी म्युनिचने साम-दाम-दंड-भेदाचा अवलंब केला नसता, तरच नवल होते. त्या लढतीत बेकनबॉर यांना मार्क करण्यासाठी बरीच झटापट झाली आणि इथेच संघर्षाची पहिली ठिणगी पडली. क्लब फुटबॉल किती संघर्षमय असू शकते, ही त्यावेळी बेकनबॉर यांच्यासाठी एक झलक होती.

बेकनबॉर अर्थातच आपल्या पहिल्या टप्प्यापासूनच आयकॉन होते आणि अगदी तरुणाईलाही त्यांची भुरळ पडली नसती तरच नवल होते. त्यांचे फॅनफॉलोईंग प्रचंड होते आणि वयाच्या 18 व्या वर्षी त्यांच्या तत्कालीन प्रेयसीला गर्भधारणा झाली, त्यावेळी ते तिला स्वीकारण्यास तयार नव्हते, अशी बरीच चर्चा रंगली होती. हा वाद इतका विकोपाला गेला, की पश्चिम जर्मनी युवा संघाने त्यांच्यावर निलंबनाची तडकाफडकी कारवाई केली. केवळ तत्कालीन प्रशिक्षक केमर यांच्या शिष्टाईमुळेच त्या वादावर पडदा टाकला गेला आणि बेकनबॉर यांना पुन्हा एकदा युवा संघात परतता आले.

बेकनबॉर यांनी बुंदेस्लिगा प्रमोशनल प्लेऑफमध्ये बायर्नतर्फे जून 1964 मध्ये क्लब पदार्पण केले आणि यानंतर त्यांची यशाची पताका विविध आघाड्यांवर फडकत राहिली. आपल्या पहिल्याच हंगामात त्यांनी युवा संघाला विजयश्री मिळवून दिली आणि यामुळे संघाचे बुंदेस्लिगात प्रमोशन झाले. बायर्न त्यानंतर 1966-67 च्या दरम्यान जर्मन कप जिंकत न्यू जर्मन लीगमधील खरेखुरे पॉवरहाऊस बनले. 1967 मध्ये या संघाने विनर्स कपवर आपली मोहर उमटवली. 1968-69 च्या हंगामात बेकनबॉर यांच्याकडे प्रथमच नेतृत्वाची कवचकुंडले प्रदान केली गेली आणि त्यानंतर त्यांचा खेळ आणखी बहरला. या प्रवासात त्यांनी संघाला विजयश्रीही संपादन करून दिली आणि आपल्यावर व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला.

बेकनबॉर हे दिग्गज बायर्न म्युनिचकडून खेळत असताना या संघाने 1972 ते 1974 या सलग तीन वर्षात विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. याचमुळे या संघाला हा चषक कायमस्वरूपी त्यांच्याकडेच ठेवण्याचा बहुमोल सन्मानही लाभला. 1968 पासून बेकनबॉर यांना चाहत्यांकडून व माध्यमांकडून डेर कैसर ही उपाधी मिळाली. अर्थात, यादरम्यान त्यांना अनेक वादंगांनाही सामोरे जावे लागले. 1969 मधील एका फायनल लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडू रेनहार्डला जाणूनबुजून ढकलल्याने त्यांच्या कारकहीर्दीला अखिलाडूवृत्तीचा कलंक लागला, तो कायमचाच! त्या लढतीत प्रेक्षकांनी हुर्यो करत बेकनबॉरच्या अब्रूची लक्ीतरे वेशीवर टांगण्यात कसर सोडली नव्हती. पण, एकाग्रता व कौशल्य जणू बेकनबॉर यांच्या नसानसात भिनले होते. इतके वातावरण विरोधात असताना, सारे प्रतिस्पर्धी त्यांना मार्क करत असतानाही बेकनबॉर यांनी विस्मयकारक खेळ साकारला आणि गोलजाळ्याचा अचूक वेध घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बेकनबॉर यांच्या व्यावसायिकतेचा आणखी एखादा दाखला शोधूनही सापडणार नाही.

1977 मध्ये बेकनबॉर यांना उत्तर अमेरिकन सॉकर लीगमधील गलेलठ्ठ पॅकेज देण्यात आले. त्यावेळी न्यूयॉर्क कॉसमॉस संघाने त्यांना करारबद्ध केले आणि बेकनबॉर यामुळे जगज्जेत्या पेलेच्या साथीने खेळताना दिसून आले. 1980 पर्यंत बेकनबॉर चारवेळा या संघातून खेळले आणि या संघाने तीनवेळा सॉकर बॉल स्पर्धेचे अजिंक्यपद संपादन करण्यातही यश मिळवले. पुढे 1983 मध्ये त्यांनी क्लबमधील कारकीर्दीची सांगता केली.

आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत बेकनबॉर यांनी पश्चिम जर्मनीतर्फे 103 सामने खेळले आणि 14 वेळा गोलजाळ्याचा वेध घेतला. 1965 मध्ये स्टॉकहोम येथे संपन्न झालेल्या स्वीडनविरुद्ध लढतीच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण नोंदवले होते. 1966 मध्ये नेदरलँडविरुद्ध त्यांनी आपला पहिला आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला. 1966 मध्ये उपजेते, 1970 मध्ये तृतीय, 1974 मध्ये चॅम्पियन्स राहिलेल्या विश्वचषक संघात त्यांचा समावेश राहिला. याशिवाय तीनवेळा ते सर्वोत्तम पुरस्काराचेही मानकरी ठरले. 1972 युरोपियन फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकून देण्यात व 1976 मध्ये उपजेतेपद मिळवून देण्यात त्यांचा वाटा अर्थातच लाख मोलाचा होता. 1973 मध्ये ते जर्मनीतर्फे सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू ठरले.

बेकनबॉर यांनी 1966 मध्ये आपला पहिला विश्वचषक खेळला आणि त्यानंतर त्यांनी या स्पर्धेवर आपली मोहिनी टाकण्यात कसर सोडली नाही. उमेदीच्या कालावधीत खेळाडू या नात्याने जगज्जेतेपद मिळवल्यानंतर त्यांनी याची पुनरावृत्ती प्रशिक्षकपदी मिळवलेल्या जगज्जेतेपदाने केली, त्यावेळी खर्‍या अर्थाने त्यांच्या महानतेवर जणू शिक्कामोर्तब झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news