Flying taxis : २०२६ पर्यंत देशात हवेत उडणाऱ्या टॅक्सी दिसणार

Flying taxis : २०२६ पर्यंत देशात हवेत उडणाऱ्या टॅक्सी दिसणार

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लवकरच भारतात हवेत उडणाऱ्या टॅक्सी पाहायला मिळणार आहेत. ही सेवा भारतात आणण्यासाठी इंटरग्लोब एंटरप्रायझेस आणि आर्चर एव्हिएशन यांनी हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांना २०२६ पर्यंत भारतात ही सेवा सुरू करायची आहे. भारतात हवाई टॅक्सी सेवा आल्यानंतर दिल्लीतील कॅनॉट प्लेस ते गुडगाव असा प्रवास अवघ्या सात मिनिटांत करता येईल. सध्या हे २७ किलोमीटर अंतर रस्त्याने जाण्यासाठी ६० ते ९० मिनिटे लागतात.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी

दोन्ही कंपन्यांमध्ये गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. यामध्ये भारतात एअर टॅक्सी आणण्याचा निर्णय घेण्यात आला. आता दोन्ही कंपन्या एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी सरकारची परवानगी घेणार आहेत. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो ही इंटरग्लोब एंटरप्रायझेसचा एक भाग आहे. त्याचवेळी, आर्चरकडे इलेक्ट्रिक वाहने आणि विमाने भाड्याने देणारी कंपनी म्हणून पाहिले जाते.

कोठे वापर

मेट्रो शहरांमध्ये हवाई टॅक्सी सेवा देण्याव्यतिरिक्त दोन्ही कंपन्यांना या इलेक्ट्रिक विमानांचा वापर कार्गो, लॉजिस्टिक, वैद्यकीय आणि आपत्कालीन सेवांमध्येही करायचा आहे. याशिवाय खासगी कंपन्याही त्यांना भाड्याने घेऊ शकतील. वैमानिक आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासोबतच भारतात या सेवेसाठी पायाभूत सुविधा विकसित करण्याचे कामही केले जाणार आहे.

चार लोक प्रवास करतील

या सेवेसाठी २०० आर्चर मिडनाईट विमाने खरेदी करण्यात येणार आहेत. या विमानांमध्ये चार प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील. या विमानांची रचना लहान वारंवार प्रवास करण्यासाठी करण्यात आली आहे.

वाहतूक समस्येवर तोडगा

इंटरग्लोबचे एमडी राहुल भाटिया म्हणाले की, कंपनीने दोन दशकांपासून भारतीय प्रवाशांना सुरक्षित आणि स्वस्त वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. आता हे एअर टॅक्सी सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. दुसरीकडे, आर्चरचे निखिल गोयल म्हणाले की, १.४ कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील अनेक शहरांमध्ये वाहतुकीच्या गंभीर समस्या आहेत. आम्ही एअर टॅक्सीद्वारे या समस्येवर उपाय देत आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news