काँग्रेसकडून ‘वंचित’ला पाच जागांचा प्रस्ताव

Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आजवर वंचित बहुजन आघाडीला चारहून अधिक जागा देणार नाही, असे दावे करणार्‍या महाविकास आघाडीने अखेर वंचित बहुजन आघाडीपुढे नमते घेतले आहे. 'वंचित'तर्फे स्वतंत्र लढण्याची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते, हे स्पष्ट झाल्यावर अखेर काँग्रेसतर्फे पुढाकार घेऊन 'वंचित'ला आता पाच जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी आघाडीच्या नेत्यांशी पुन्हा जागावाटपाची चर्चा करायला होकार दर्शवला आहे. या पाच जागा काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कोट्यातून देण्यात येणार आहेत.

महाविकास आघाडीकडून 'वंचित'ला लोकसभेच्या चार जागा देण्याचा प्रस्ताव दिल्यामुळे चर्चेचे घोडे अडले होते. परंतु, काँग्रेसने महाविकास आघाडीतर्फे मंगळवारी एक पाऊल पुढे टाकत 'वंचित'ला पाच जागा देण्याचा प्रस्ताव दिला. जर पाच जागांचा प्रस्ताव मान्य झाला, तर याबाबत 'वंचित' ही महाविकास आघाडीत सामील झाल्याबाबत घोषणा होऊ शकेल. प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढण्याची घोषणा करण्याची तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने नमते घेत त्यांच्याशी संपर्क केल्याने आंबेडकरांनी प्रस्तावित पत्रकार परिषद पुढे ढकलली आहे.

लोकसभेच्या चार जागा देण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीने 'वंचित'ला दिला होता, तर सात जागांचा प्रस्ताव 'वंचित'ने आघाडीला याआधी दिला आहे; पण ठाकरे आणि पवार गटाचा 'वंचित'ला चारपेक्षा जास्त जागा देण्यास विरोध आहे. 'वंचित'ने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे चार उमेदवार पाडले होते. त्यामुळे 'वंचित'ला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचे नेते आग्रही आहेत.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्रपक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. त्यामुळे कोंडी फुटली असून, पुन्हा 'वंचित'चे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

आंबेडकरांशी चर्चा करून निश्चित मार्ग काढणार : संजय राऊत

वंचित बहुजन आघाडी हा आघाडीतला महत्त्वाचा व सन्माननीय घटकपक्ष आहे. प्रकाश आंबेडकर हे सगळ्यांचे नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. आम्ही आंबेडकरांशी पुन्हा चर्चा करून निश्चित मार्ग काढू, असा विश्वास शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. वंचित बहुजन आघाडी आम्हाला महाविकास आघाडी सोबत हवी आहे. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

शाहू महाराजांच्या उमेदवारीचा निर्णय एकत्रित घेतला

शाहू महाराज यांच्या उमेदवारीबाबत 'मविआ'ने एकत्रितपणे राज्यातच निर्णय घेतला. आमचे निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. आम्हाला दिल्लीची गुलामी करावी लागत नाही, असा टोलाही त्यांनी महायुतीच्या नेत्यांना लगावला. जागावाटपाबाबत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हातात काहीही नाही. स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत, हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाहीत. पूर्वी महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत 'मातोश्री'वर चर्चा व्हायची आणि 'मातोश्री'तूनच निर्णय घेतले जात होते. आता शिंदे, अजित पवार आणि उदयनराजे यांना दिल्लीत जावे लागते, असे राऊत म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news