सांगली; पुढारी वृत्तसेवा : येथील जामवाडीतील राहुल संजय साळुंखे (वय 19) याचा गणपती मंदिरसमोर खून करणार्या पाच संशयितांना अटक करण्यात शहर पोलिसांना गुरुवारी सकाळी यश आले. अवघ्या 12 तासात या खुनाचा छडा लावला.
अटक केलेल्यांमध्ये अनिकेत ऊर्फ सोन्या संजय सलगरे (वय 19), भूषण संजय एडके (26), अक्षय चंद्रकांत सलगरे (27), अभिषेक सतीश भोजने (20, अरिहंत कॉलनी, शामरावनगर, सांगली) व एका अल्पवयीनचा समावेश आहे.
मृत राहुल व त्याचा मित्र तेजस प्रकाश करांडे (21, जामवाडी) हे दोघे एका मुलीने गणपती मंदिरजवळ भेटायला बोलाविले होते, म्हणून तिथे दुचाकीवरून जाऊन थांबले. तेवढ्यात संशयित हातात कोयते व अन्य धारदार हत्यारे घेऊन गेले. त्यांनी राहुलला टार्गेट करून त्याच्यावर हल्ला चढविला. राहुल जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. संशयितांनी पाठलाग करून त्याला गणपती मंदिरजवळ गाठले. डोक्यात, पाठीवर, छातीवर व पोटात सपासप वार केले. यामध्ये तो जागीच मरण पावला. तेजस कारंडे याच्यावरही हल्ला केला होता, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता.
राहुलचा जामवाडीतील काही मित्रांचा ग्रुप आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्रांच्या मदतीने कोल्हापूर रस्त्यावरील अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. मुलीच्या आईवर कोयत्याने हल्ला केला. या गुन्ह्यात राहुलसह पाच जणांना अटक केली होती, खुनामागे हेही मुख्य कारण आहे.
संशयित गुरुवारी सकाळी शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिस निरीक्षक संजय मोरे, उपनिरीक्षक महादेव पोवार, हवालदार गौतम कांबळे, संकेत कानडे यांच्या पथकाने त्यांना अटक केली. त्यांनी खून केल्याची कबुली दिली आहे. त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात उभे केले जाणार आहे.
राहुलचा खून करणार्या संशयितांना अटक केल्याचे समजताच काही जणांनी गवळी गल्लीतील त्यांच्या घरावर दगडफेक केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. नातेवाईकांनी दगडफेक करणार्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली होती.