Fitness : फिटनेस खेळाडूंचा

Fitness : फिटनेस खेळाडूंचा

आपली जीवनशैली आणि कामाचे स्वरूप यानुसार आपला आहारविहार असणे आवश्यक असते. म्हणजेच बैठे काम करणार्‍यांचे आरोग्यमान उत्तम राहायचे असेल, तर त्यानुरूप आहारविहार असला पाहिजे; पण त्यांच्यासाठीचा आहारविहार हा मैदानी खेळ खेळणार्‍यांसाठी लाभदायक अथवा योग्य ठरेल असे नाही. मैदानी खेळ खेळणार्‍यांच्या आहारामध्ये स्नायूंना पुष्टी देणार्‍या पदार्थांचा समावेश असणे आवश्यक असते.

संबंधित बातम्या 

समाजातल्या विविध घटकांमध्ये क्रिकेट, फुटबॉल, हॉकी या मैदानी खेळांप्रमाणे बुद्धिबळासारखे बैठे खेळ खेळणार्‍यांचीही संख्या बरीच असते. अनेक जण व्यवसाय म्हणूनही या खेळाकडे बघतात आणि व्यावसायिक खेळाडू म्हणून अनेक वर्षे व्यतीत करतात. या दरम्यान या सर्वांनाच फिटनेसची अत्यंत आवश्यकता असते, नव्हे ते अपरिहार्यच असते. खरे तर, त्यांचा असणारा नियमित सराव हा महत्त्वाचा भाग असला, तरी सरावासाठी फिट असणेसुद्धा आवश्यक असते. या त्यांच्या फिटनेससाठी त्या खेळाडूंनी दिनक्रमात काही गोष्टी आग्रहाने पाळल्या आणि टाळल्या पाहिजेत.

अभ्यंगाची उपयुक्तता

अभ्यंग म्हणजे दररोज स्नानापूर्वी थोडे तेल अंगाला लावणे. हे तर प्रत्येकाला उपयोगी आहे. खेळाडूमध्ये तर याचा खूपच उपयोग अथवा प्रभाव होताना दिसून येतो. कारण, याने मांसधातूची शक्ती वाढते. पुष्टी होते. सांध्यांची हालचाल सुलभ होते. अभ्यंगाचा आणखी एक फायदा म्हणजे मैदानी खेळाडूंची पाय दुखण्याची तक्रार असेल, तर ती लवकर दूर होते. तसेच बैठे खेळ खेळणार्‍यांना आवश्यक असलेली डोक्याची शांतताही याने लाभते.

खेळाडूंनी रोज नियमित व्यायाम करणे हेही तितकेच महत्त्वाचे आणि उपयुक्त असते. यामध्ये सूर्यनमस्कार हा एक आदर्श व्यायाम आहे. यामध्ये 10 विविध आसनांचा समावेश होतो. याने पचनसंस्थेपासून रक्ताभिसरण संस्थेपर्यंत शरीरातील विविध संस्थांचे कार्य उत्तम राहायला मदत होते. मैदानी खेळाडूंना अनेकदा घामोळे येण्याचा खूप त्रास होतो. यासाठी ज्येष्ठमध, चंदन, अनंतमूळ अशा त्वचेला हितकारक वनस्पतींनी युक्त असलेले उटणे स्नानाचेवेळी त्वचेला लावावे. सतत जागरण करणे मैदानी तसेच बैठ्या खेळाडूंनाही मानवत नाही. त्याचा त्रास होतो म्हणून खेळाडूंनी योग्य तेवढी झोप घेणे गरजेचे आहे. खेळाडूंच्या आहारात थोडीही गडबड झाली, तरीही त्याचा लगेच त्रास होऊ शकतो. मैदानी खेळाडूंना पोट खूप भरलेले असताना किंवा एकदम रिकामे असताना खेळणे आरोग्यद़ृष्ट्या न परवडणारे असते.

खेळाडूंच्या खाण्यात दूध-तूप अशा स्निग्ध पदार्थांचा समावेश हमखास असला पाहिजे. कारण, मैदानी खेळांमुळे, शरीराच्या सततच्या होणार्‍या हालचालींमुळे त्यांच्या शरीराची झीज सतत होत असते. त्यामुळे शरीरात रुक्षता (कोरडेपणा) निर्माण होण्याची शक्यता असते. ही रुक्षता दुधा-तुपाच्या सेवनाने टळते. आहारातील जे पदार्थ पचायला सुलभ असतील त्यांचे सेवन खेळाडूंनी अधिक करावे. मुगाची डाळ, भात, गव्हाचे हलके फुलके, विविध फळभाज्या, काही पालेभाज्या, फळे यांचा समावेश त्यांच्या आहारात असावा.

विशेष करून बटाटे, डाळीच्या पिठाचे पदार्थ हेही टाळण्याचा प्रयत्न करायला हवा. अतिथंड, अतिउष्ण, पचायला अतिशय जड अशा पदार्थांचा वापर शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. फ्रीजमधले तसेच शिळे अन्न, शीतपेये यांचाही मोह टाळणे खेळाडूंच्या प्रकृतीच्या द़ृष्टीने उत्तम ठरते. शतावरी, अश्वगंधा या वनस्पतींची चुर्णे आणि दूध (अर्थातच गायीचे) हे मिश्रण म्हणजे खेळाडूंचे उत्तम टॉनिक होय. आवळा असलेले 'च्यवनप्राश' रसायन हेही खेळाडूंना चांगले. खजुरासारखे फळ आणि तूप हे विशेषतः स्नायूंना पुष्टीदायक, बुद्धीची धार वाढवणारे असते.

बुद्धिबळासारखे बैठे खेळ खेळणार्‍या व्यक्तींनी रोज चालण्याचा व्यायाम करणे आवश्यक असते. नाही तर बैठे काम सतत करावे लागणार्‍या व्यक्तींना होणारे स्थुलतेसारखे विकार यांना सहन करावे लागतात. त्याचा त्यांच्या खेळावरही दुष्परिणाम होतो. म्हणूनच खेळ चांगला खेळायचा असेल, तर फिटनेस हवा आणि फीट राहायचे असेल, तर दिनक्रम नियमित हवा.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news