पुढारी ऑनलाईन डेस्क : श्रीराम नेने व माधुरी दीक्षित नेने ( Madhuri Dixit ) निर्मित 'पंचक' चित्रपटातील जगण्याचे सार उमगवणारे एक सुरेख गाणे नुकतेच प्रदर्शित झाले आहे. 'ज्याला त्याला उमगते, ज्याची त्याची भाषा, बाकी इथे जगण्याचा रोजचा तमाशा…' असे बोल असलेले हे गाणे आयुष्याचा भावार्थ सांगत आहे. गुरु ठाकूर यांचे हृदयस्पर्शी शब्द लाभलेल्या या भावनिक गाण्याला मंगेश धाकडे यांनी संगीत दिले आहे. तर अभिजीत कोसंबी याचा जादुई आवाज या गाण्याला लाभला आहे.
संबंधित बातम्या
अभिनेत्री माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) हिने तिच्या इन्स्टाग्रामवर 'पंचक' चित्रपटातील गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात देव दर्शनाची रांग पाहायला मिळतेय. आणि लोक देवाच्या चरणी लीन होतानाही दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'अंधाराला सापडू दे उजेडाचं दार रे; तुझं तुला कळू आलं तोच चमत्कार रे…गुरु ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले, सादर आहे पंचकचे नवे गाणे 'चमत्कार'!' असे लिहिले आहे. गाण्याचा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केलाय.
दिग्दर्शक राहुल आवटे म्हणतात की, " गुरु ठाकूर यांनी अत्यंत सुंदर शब्दात जीवनातील सफर मांडली आहे. ज्याला मंगेश धाकडे यांनी उत्तम संगीताची साथ लाभली आहे. खूप भावनिक आणि मनाला भिडणारे हे गाणे आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी साधर्म्य साधणारे हे गाणे आहे."
जयंत जठार आणि राहुल आवटे दिग्दर्शित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य कार्यकारी निर्माते आहेत. आदिनाथ कोठारे, दिलीप प्रभावळकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, आशिष कुलकर्णी, दिप्ती देवी, विद्याधर जोशी, आरती वडगबाळकर, गणेश मयेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ५ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.