अरब मुस्लिम देशात पहिले हिंदू मंदिर पूर्णत्वाकडे!

अबुधाबीतील हिंदू मंदिर
अबुधाबीतील हिंदू मंदिर
अबुधाबी, वृत्तसंस्था : अयोध्येतील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठेनंतर आखाती देश संयुक्त अरब अमिरात (यूएई) या देशातील अबुधाबी या महानगरातील अल वाकबा येथे भव्य हिंदू मंदिराच्या उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आहे. मंदिराचा शुभारंभ 14 फेब्रुवारीला वसंत पंचमीच्या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या मंदिराची 7 शिखरे ही संयुक्त अरबमधील 7 अमिरातींचे प्रतिनिधित्व करतात, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर वाळूच्या पर्वतासारखी रचना साकारली आहे. त्यासाठीही यूएईतील सातही अमिरातींतून आणलेल्या वाळूचा वापर करण्यात आला आहे, हे विशेष! हे मंदिर शिल्पकला, स्थापत्याचाही एक आदर्श नमुना आहे. स्वामीनारायण संप्रदायाच्या प्रमुख गुरुवर्यांनी (प्रमुख स्वामीजी महाराज) 1997 मध्ये अबुधाबीला भेट दिली होती. येथे हिंदू मंदिर असावे, हा विचार त्यांनी तेव्हा मांडला. आज 27 वर्षांनंतर तो प्रत्यक्षात आला आहे.
मुळाशी नाते घट्ट
* गंगा, यमुना, सरस्वतीच्या संगमाचे  द़ृश्य मंदिरात उभे केले आहे.
* मुख्य प्रवेशद्वाराआधी जिन्यातील दोन्ही बाजूने गंगा व यमुनेचे प्रवाह येताना दिसतात.
* लाईट इफेक्टमधून सरस्वतीचे द़ृश्य उभे केले आहे.
* मंदिराच्या उजव्या बाजूला गंगा घाटाचे द़ृश्य उभे केले आहे. खरेखुरे गंगाजल त्यात आहे.
अरब भूमीत हिंदू  मंदिर असे झाले शक्य
* एक काळ असा होता की, इस्लामच्या उदयाचे केंद्र असलेल्या अरब भूमीत अरब अमिरातीत, अबुधाबीत मंदिराची कल्पनाही कुणी करणे शक्य नव्हते, पण आता ते घडते आहे!
* 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील दौर्‍यावर असताना यूएई सरकारने मंदिरासाठी अबुधाबीलगत हा भव्य भूखंड उपलब्ध करून दिला.
* 2018 मध्ये दुबई दौर्‍यावर असताना ओपेरा हाऊसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेच्या या मंदिराच्या कोनशिलेचे अनावरण केले होते.
14 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
आकडे बोलतात…
26 लाख मूळ भारतीय यूएईत राहतात.
30 टक्के लोकसंख्या मूळ भारतीयांची
20 हजार चौरस मीटर परिसरातील निम्मे भागात मंदिर तर उर्वरित भाग वाहनतळ.
20 हजार टनांहून अधिक दगड,  संगमरवराचा मंदिरात वापर
700 कंटेनरने दगड भारतातून आणला.
3 वर्षांत झाले बांधकाम पूर्ण. अंतिम हात सुरू
2 हजार राजस्थानी, गुजराथी कारागिर
402 शुभ्र संगमरवरात स्तंभ, प्रतिमा
700 कोटी रुपये मंदिरावरील एकूण खर्च
30 मिनिटांत अबुधाबीपासून अल वाकबाला पोहोचता येते.
10 हजार भाविकांना एकावेळी दर्शन शक्य
मंदिरात  या देवता 
* राम-सीता, शिव-पार्वती, भगवान श्रीकृष्ण, अय्यप्पा स्वामी (भगवान कार्तिक), जगन्नाथ बालाजी (श्रीविष्णू) आदी देवता या मंदिराची शोभा वाढवतील.
इतर वैशिष्ट्ये
* बांधकामात संगमरवर व राजस्थानी लाईमस्टोनचा वापर
* लोखंड व पोलादाचा वापर झालेला नाही.
* भिंतीवर महाभारत, गीतेमधील प्रसंग साकारलेले आहेत.
* संपूर्ण रामायण, जगन्नाथ यात्रा व शिवपुराणही कोरण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news