नगर: अखेर जावेद शेख या बोगस मुन्नाभाईवर गुन्हा दाखल

नगर: अखेर जावेद शेख या बोगस मुन्नाभाईवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: शहरातील बागवानपुरा भागात गेली अनेक वर्षापासून वैद्यकीय व्यवसायाची कुठल्याही प्रकारची पदवी नसताना बोगस वैद्यक व्यवसाय करणार्‍या जावेद आय्युब शेख या मुन्नाभाईवर अखेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्याने केलेले सर्व दावे फोल ठरले आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील बागवानपुर्‍यातील नवरंग कॉम्प्लेक्समध्ये जावेद आयुब शेख याने योग आणि निसर्गोपचाराचे अनधिकृत प्रमाणपत्र व अवघे बारावीपर्यंत कला शाखेचे शिक्षण घेऊन हमसफर क्लिनिक या नावाने दवाखाना सुरू केला होता. या दवाखान्यात तो रुग्णांवर उपचार करत होता. याबाबतची तक्रार तत्कालीन प्रांताधिकारी डॉ. शशि कांत मंगरुळे यांच्याकडे केली होती. त्यानंतर प्रांताधिकारी मंगरूळ यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांना चौकशी करुन कारवाईचे आदेश दिले होते.

बोगस डॉक्टर शोध समितीच्या पथकाने जावेद शेख याच्या क्लिनिकवरती छापा टाकला असता त्याच्याकडे बारावी कला शाखेचे गुणपत्रक आणि छत्रपती संभाजीनगरमधील एका संस्थेकडून 'नॅचरोपॅथी व योगीक सायन्स हा कोर्स केल्याचे प्रमाणपत्र त्याने पथकाला दाखविले. तो केवळ बारावीचे शिक्षण घेऊन चक्क रुग्णांवर उपचार करीत असल्याचेही सिद्ध झाले. सर्व अहवाल मुख्याधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांना दिले.

महाराष्ट्र वैद्यक व्यवसायी अधिनियमानुसार डॉ. जावेद शेख यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्याची शिफारस पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांना केली होती. मात्र, याची कारवाई करण्याचा अधिकार आपल्याला नाही, तर तो अधिकार ग्रामीणरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजकुमार जऱ्हाड यांना असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. जऱ्हाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बोगस डॉक्टर शोध समितीचे सचिव डॉ. घोलप असल्यामुळे त्यांनीच कारवाई करणे गरजेचे आहे. या दोघांच्या टोलवाटोलवीमुळे डॉ. शेख याच्यावर कारवाई करण्यास विलंब झाला.

जावेद शेख यास वैद्यकीय व्यवसाय नोंदणीबाबत प्रमाणपत्र असल्याबाबत विचारणा केली असता आवश्यक तितका वेळ देऊनही, तो अधिकृत कागदपत्रे सादर करु शकला नाही. त्यामुळे तोबोगस डॉक्टर असल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतिभा कचकुरे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी जावेद अयुब शेख याच्याविरोधात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमाच्या कलम 33 व 36 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संभाजीनगर येथील एका संस्थेने मला नॅचरोपॅथी व योगीक सायन्स' या विषयाची पदवी दिलेली आहे. तसेच निसर्गोपचाराचे सर्व कागदपत्रे, दाखले पदवी प्रमाणपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच मी माझ्या नावापुढे डॉक्टर हा शब्द प्रयोग करत आहे. जरी पोलिसात माझ्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी मी माझ्या सर्व कागदपत्राच्या आधारावर न्यायालयात धाव घेणार आहे. न्यायालयीन लढा लढणार आहे. न्यायालयातून मलानक्कीच दिलासा मिळेल
– डॉ. जावेद अय्युब शेख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news