अर्थमंत्री म्हणून मी राज्यातील कोणत्याही प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, तुम्हाला काय त्रास? आपल्या अधिकारांवर अजित पवार ठाम

अर्थमंत्री म्हणून मी राज्यातील कोणत्याही प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो, तुम्हाला काय त्रास? आपल्या अधिकारांवर अजित पवार ठाम
Published on
Updated on

पुणे : मंत्रालयात असणाऱ्या 'वॉर रूम'बरोबर अनेक मुद्द्यांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याची चर्चा सर्वत्र आहे. 'वॉर रूम'च्या माध्यमातून अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारांवर अतिक्रमण केल्याची असतानाच यावर अजित पवार यांनी पुण्यात महत्त्वाचे विधान केले आहे.

मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून प्रकल्पांचा आणि विकासकामांचा आढावा घेऊ शकतो, असे म्हणत पवार यांनी वॉर रूमच्या आपल्या अधिकारांवर दावाच केला आहे. ते शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. सध्या मुख्यमंत्री शिंदेही नाराज असल्याच्या जोरदार चर्चा आता सुरू झाल्या आहेत. पुण्यात १२ ऑगस्ट रोजी चांदनी चौकाच्या उद्घाटन कार्यक्रमालाही शिंदे गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच्या कोल्ड वॉरवर अजित पवारांनी यावेळी खुलासा केला. पवार म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केला नाही. राज्याचा अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा, प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. तुम्हाला काय त्रास आहे? मी महाविकास आघाडीत असताना देखील अनेकदा राज्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करण्यासाठी 15 दिवसाने आढावा बैठक घ्यायचो आणि त्याला गती द्यायचो. आताही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीचा आढावा ते घेत असतात. राधेश्याम मोपलवार यांच्याकडे त्या समितीची जबाबदारी आहे. तसेच मी माझ्या पद्धतीने आढावा घेत आहे. वास्तविक आम्ही सरकारमध्ये कशाला गेलो? महाराष्ट्राचा विकास व्हावा म्हणूनच गेलो. जनतेचे प्रश्न सुटावेत यासाठी गेलो. हे सर्व करण्याबरोबरच देश पातळीवर मोदींना सपोर्ट करण्यासाठी गेलो. यामध्ये कोणाला काय अडचण आहे?

अर्थमंत्री म्हणून मी राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो. मात्र, प्रकल्पाबाबत अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांचाच असतो. दरम्यान मी, जी आढावा बैठक घेतली, त्या बैठकीला राधेश्याम मोपलवारही हजर होते, असेही पवार म्हणाले. मात्र, माध्यमांनी राधेश्याम मोपलवारांना वगळून बैठक घेतली, अशा बातम्या चालवल्या. माध्यमांनी कोणतीही खातरजमा न करता अशा चुकीच्या बातम्या दाखवू नये. माझ्या बैठकीमुळे राज्यातील प्रश्न, मेट्रोचे प्रश्न मार्गी लागत असेल तर काय अडचण आहे. यंत्रणा हलवली तरच कामे होतात. मी बैठकीत पॉलिटेक्निक, महावितरण आणि खासगी जागेचे प्रश्न होते. त्याचा आढावा घेतला, असंही अजित पवार म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news