कोल्हापुरात चित्रीकरण अन् चित्रपट हिट : रवींद्र महाजनी यांच्या आठवणींना उजाळा

कोल्हापुरात चित्रीकरण अन् चित्रपट हिट : रवींद्र महाजनी यांच्या आठवणींना उजाळा
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठी चित्रपटातील एकेकाळचा विनोद खन्ना अशी ओळख असणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचे कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या तांबड्या-पांढर्‍या रश्श्यावर विशेष प्रेम होते. कोल्हापुरात चित्रीकरण झालेला 'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'गोंधळात गोंधळ', 'आराम हराम आहे' हे चित्रपट सुपरहिट झाल्याने कोल्हापुरात चित्रीकरण झाले की चित्रपट हिट व्हायचा, असे समीकरणच झाले होते.

रवींद्र महाजनी यांनी मराठी, हिंदी गुजराती अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले. मराठी चित्रपटातील कोण त्यांना अमिताभ बच्चन तर कोणी विनोद खन्ना म्हणायचे. कोल्हापुरात मराठी चित्रपटाचे चित्रीकरण करणार म्हटले की त्यांचा उत्साह द्विगुणीत होत असे. व्ही. शांताराम यांच्यासारख्या दिग्दर्शकांबरोबर 'झुंज' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. याचे चित्रीकरण शालिनी स्टुडिओमध्ये झाले. हा चित्रपट हिट झाला. व्ही. शांताराम यांच्या तालमीत तयार झालेला कसदार अभिनेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

राजदत्त यांच्या 'मुंबईच्या फौजदार' चित्रपटाने मराठी प्रेक्षकांवर भुरळ घातली. आजही या चित्रपटातील अभिनेत्री रंजना व रवींद्र महाजनी यांचा मराठमोळा रांगड्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळते. 'मुंबईचा फौजदार' आणि अशोक सराफ यांचा 'बिन कामाचा नवरा' हे दोन्ही चित्रपट 1984 मध्ये प्रसिद्ध झाले. दोन्ही चित्रपटांत अभिनेत्री म्हणून रंजना काम करत होती, पण 'मुंबईचा फौजदार' बॉक्स ऑफिसवर हिट झाला.

'मुंबईचा फौजदार', 'लक्ष्मीची पाऊले', 'सुळावरची पोळी', 'झुंज', 'देवता', 'आराम हराम आहे', 'देवघर', 'गोंधळात गोंधळ', 'चांदणे शिंपीत जा', 'थोरली जाऊ', 'सतीची पुण्याई' या राजदत्त, व्ही. शांताराम, कमलाकार तोरणे, अनंत माने दिग्दर्शित चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओ व शालिनी स्टुडिओ येथे होत होते.

झणझणीत मिसळ, तांबडा-पांढरा रश्श्यावर ताव

कोल्हापुरात आले की ताराबाई रोडवरील आर. आर. शेरेटन हॉटेल येथे ते वास्तव्याला असायचे. कोल्हापुरात आले की झणझणीत मिसळ व तांबडा-पांढरा रश्श्यावर ताव मारायला आवडायचे. यासाठी त्यांचा खास आग्रह असायचा. अरुण सरनाईक, निळू फुले, अशोक सराफ, कुलदीप पवार अशा दिग्गज अभिनेत्यांच्या काळात रवींद्र महाजनी यांनी मराठी चित्रपटांमध्ये आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले होते. कथा कोणतीही असो, दिग्दर्शक कोणीही असो कोल्हापुरात चित्रीकरण झाले की चित्रपट हिट होणारच यावर महाजनी यांचा ठाम विश्वास होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news