आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  आरे वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये युवा सेनेमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर केल्याप्रकरणी युवा सेना आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. तीन दिवसांत योग्य ती कारवाई करून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. यामुळे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कांजूरमार्ग येथे होणारी मेट्रो कारशेड पुन्हा आरेमध्ये उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने पर्यावरण प्रेमींनी आरे वाचविण्यासाठी आंदोलन तीव्र केले आहे. दर रविवारी आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यावरण प्रेमींनी केली आहे. अलीकडेच झालेल्या आंदोलनात आदित्य ठाकरे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी नव्या सरकारवर टीका केली होती. आंदोलनात अनेक अल्पवयीन मुलांनी सहभाग घेतला होता. या मुद्यावरून आता राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने मुंबई पोलिसांना पाठविलेल्या पत्रात आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेची युवा शाखा असलेल्या युवा सेनेमध्ये अल्पवयीन मुलांचा वापर 'आरे वाचवा' आंदोलनासाठी केला आहे. याबाबतच्या काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधितांनी हातात पोस्टर घेऊन आंदोलन करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे फोटो देखील शेअर केले आहेत. त्यामुळे संबंधित आरोपीविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून चौकशी करण्याची विनंती, आयोगाकडून केली गेली आहे. हे पत्र मिळाल्यानंतर तीन दिवसात कारवाई करून संबंधित अहवाल आयोगाकडे पाठवावा, असेही संबंधित पत्रात नमूद करण्यात आले आहे.

  • वरील छायाचित्र आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर टाकले होते. तोच पुरावा ग्राह्य मानून आयोगाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news