कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी; जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू

कोल्हापूर : कळंबा कारागृहात कैद्यांमध्ये मारामारी; जन्मठेप भोगणाऱ्या कैद्याचा मृत्यू
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कळंबा मध्यवर्ती कारागृहात (कळंबा कारागृह) गुरुवारी सायंकाळी कैद्यांमध्ये हाणामारी झाली. चौघा कैद्यांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी निशिकांत बाबुराव कांबळे (वय 47, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चौघांवरही खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. या हल्ल्याचे चित्रण सीसीटीव्ही फुटेजमध्ये झाले आहे.

यासंदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शिवाजी पेठेतील निशिकांत कांबळे आणि त्याच्या तीन साथीदारांनी 2003 मध्ये दारूच्या नशेत एकाचा खून केला होता. याप्रकरणी 2005 मध्ये त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

निशिकांत कळंबा कारागृह मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. अचानकपणे तो अन्य कैद्यांच्या अंगावर धावून जात होता. हाताला लागेल ते साहित्य घेऊन तो सहकारी कैद्यांवर हल्ल्याचा प्रयत्न करत होता.

गुरुवारी सायंकाळी आप्पा, सुदर्शन आणि अन्य दोन कैद्यांशी निशिकांतचा वाद झाला. या वादावादीत निशिकांतने फरशी उचलून त्यांच्या अंगावर भिरकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यामध्ये हमरीतुमरी आणि एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.

लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण

बरॅकमधील अन्य कैद्यांनी निशिकांतला समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अधिकच चिडला होता. चारही हल्‍लेखोर कैद्यांना शिवीगाळ करून, तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशीही धमकी तो देत होता. या प्रकाराने संतापलेल्या चारही कैद्यांनी निशिकांत कांबळे याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

या प्रकारानंतर भेदरलेल्या निशिकांतचा रक्‍तदाब कमी झाला. तो बरॅकमध्ये लोळू लागला. हा प्रकार इतर कैद्यांच्या लक्षात आला. प्रकृती गंभीर बनल्याने त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने निशिकांतची प्रकृती गंभीर बनल्याचे प्रारंभी सांगण्यात आले. मात्र, कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी कारागृहातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यामध्ये निशिकांतला चौघे बेदम मारहाण करत असल्याचे दिसून आले. दरम्यानच्या काळात उपचार सुरू असताना निशिकांतचा मृत्यू झाला.

दरम्यान, जन्मठेपेची शिक्षा भोगणार्‍या कैद्याचा इतर चार कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समजताच कळंबा कारागृहातील अधिकारी आणि पोलिस अधिकारी तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल झाले. संशयित चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक संतोष जाधव, सहायक निरीक्षक अरविंद कांबळे यांच्यासह अधिकारी आणि पोलिसांचा फौजफाटा रात्री उशिरा शासकीय रुग्णालयात दाखल झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news