फिफा विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेचे रविवारी बिगुल वाजले असून पहिल्या सामन्यात यजमान कतारला इक्वेडोरने हरवले. अरब देशांमध्ये खेळला जाणारा हा पहिला फिफा विश्वचषक आहे. यंदाच्या स्पर्धेत 32 संघ सहभागी असून त्यांची 8 गटांत विभागणी करण्यात आली आहे. जर्मनीचा मुकोको हा 17 वर्षांचा खेळाडू स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू असून मेक्सिकोचा अल्फ्रेडो तालावेरा हा सर्वात वयस्कर खेळाडू आहे, तो 40 वर्षांचा आहे.
सर्वात तरुण खेळाडू : युसूफ मुकोको (जर्मनी)
जर्मन संघ विश्वचषक जिंकण्याच्या प्रमुख दावेदारांपैकी एक आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा उत्तम मिलाफ आहे. मात्र, संघात असे दोन खेळाडू आहेत ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यामध्ये 18 वर्षीय जमाल मुसियाला आणि 17 वर्षीय युसूफ मुकोको यांचा समावेश आहे. यंदाच्या फिफा विश्वचषकात युसूफ हा सर्वात तरुण खेळाडू आहे. सध्या तो जर्मनीचा उगवता स्टार मानला जात आहे. या मोसमातील बुंडेस्लिगामधील त्याचे रेकॉर्ड प्रभावी ठरले आहे. बोरुसिया डॉर्टमंडकडून खेळताना युसूफने सहा गोल केले आहेत आणि तीन असिस्ट केले आहेत. युसूफने आपल्या कामगिरीने जर्मन व्यवस्थापक हॅन्सी फ्लिकचे लक्ष वेधून घेतले. स्टार फुटबॉलपटू टिमो वर्नर दुखापतीने बाहेर पडल्यानंतर युसूफचा जर्मन संघात समावेश करण्यात आला होता.
सर्वात वयस्कर खेळाडू : अल्फ्रेडो तालावेरा (मेक्सिको )
कतारमधील फिफा विश्वचषकात अनेक संघांनी आपल्या संघात अनुभवी खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये 39 वर्षीय डॅनी अल्वेस (ब्राझील), 38 वर्षीय टियागो सिल्वा (ब्राझील), 37 वर्षीय लुका मॉड्रिक (क्रोएशिया) आणि 37 वर्षीय स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो (पोर्तुगाल) यांचा समावेश आहे. मात्र, मेक्सिकोचा गोलकीपर अल्फ्रेडो तालावेरा हा या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात वयस्कर खेळाडू आहे. अल्फ्रेडो 40 वर्षांचा आहे. तो एफसी जुआरेझसाठी क्लब स्तरावर खेळतो. अल्फ्रेडो विश्वचषकातील दिग्गज फुटबॉलपटूंपैकी एक आहे. त्याचा सहकारी गोलरक्षक गिलेर्मो ओचोआही 37 वर्षांचा आहे.
सर्वात कमी उंचीचा खेळाडू: इलियास करे (मोरोक्को, 5 फूट, 2 इंच)
मोरोक्को संघ 'ग्रुप एफ'मध्ये आहे. या गटात बेल्जियम कॅनडा, क्रोएशिया या संघांचा समावेश आहे. पण मोरोक्कन संघ या गटात यंदा मोठा अपसेट घडवू शकतो. मोरोक्को संघाची जबाबदारी 10 नंबरची जर्सी परिधान करणार्या इलियास कीरच्या हाती असेल. कमी उंची असूनही समोरच्या संघाला चकित करण्यात हा स्टार माहिर आहे. मैदानावरील त्याचा वेग आणि कौशल्य पाहण्यासारखे आहे. क्लब स्तरावर इलियासची कामगिरी प्रभावी ठरली आहे. त्याने इंग्लिश चॅम्पियनशिप लीगमध्ये क्लब क्यूपीआर सोबत या हंगामात तीन गोल केले आणि सहा असिस्ट केले आहेत. (FIFA World Cup)
सर्वात उंच असलेला खेळाडू : अँड्रियास नोपर्ट (नेदरलँड, 6 फूट, 6 इंच)
नेदरलँडचा गोलकीपर अँड्रियास हा कतार येथील फिफा विश्वचषकातील सर्वात उंच खेळाडू आहे. तो लुई व्हॅन गालच्या संघात प्रवेश करण्यात यशस्वी झाला. हीरेनवीन क्लबसाठी त्याची कामगिरी प्रभावी होती. त्याने 14 सामन्यांत सहा उत्कृष्ट सेव्ह केले. नेदरलँडचा संघ या प्रतिभावान गोलरक्षकावर अवलंबून असेल. तो नेदरलँडकडून खेळताना क्लबमधील आपल्या लक्षवेधी कामगिरीची पुनरावृत्ती करेल, अशी संघ सहकार्यांसह चाहत्यांना अपेक्षा आहे.
सर्वाधिक सामने : लियोनल मेस्सी (अर्जेंटिना)
अर्जेंटिनाचा कर्णधार आणि या विश्वचषकातील स्टार खेळाडूंपैकी एक असलेला लियोनल मेस्सीकडे यंदा सर्वांचे लक्ष लागले आहे. हा त्याचा शेवटचा विश्वचषक आहे. अशा परिस्थितीत तो अर्जेंटिनाला विश्वचषकाची तिसरी ट्रॉफी जिंकून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. 2006 फिफा विश्वचषक स्पर्धेत मेस्सी पहिल्यांदा खेळला. यंदाचा कतारमधील त्याची ही पाचवी विश्वचषक स्पर्धा आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक 19 सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. तसेच, त्याने आपल्या देशासाठी सर्वाधिक सामने खेळले आहेत. मेस्सीने अर्जेंटिनासाठी 165 सामने खेळले असून 91 गोल केले आहेत.
सर्वाधिक गोल आणि असिस्ट : थॉमस मुलर (जर्मनी)
जर्मनीचा स्टार फॉरवर्ड थॉमस मुलर कतारमधील विश्वचषकात भाग घेणार्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल आणि असिस्ट करण्यात आघाडीवर आहे. या स्पर्धेत त्याच्या नाववर आतापर्यंत 10 गोलची नोंद असून सहा गोलमध्ये त्याने असिस्ट केले आहे. जर्मन संघात थॉमसला रेडिओ म्युलर या नावानेही ओळखले जाते. हा खेळाडू मैदानावर अतिशय हुशारीने प्रतिस्पर्धी संघाच्या बचावपटूंना चकवा देत गोल जाळे भेदतो. 2014 मध्ये जेव्हा जर्मन संघाने फिफा विश्वचषक जिंकला तेव्हा म्युलरने त्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच वर्षी त्याला सिल्व्हर बॉल अॅवॉर्डही प्रदान करण्यात आला होता. जेव्हा संघाला गोलची गरज असते तेव्हा म्युलर हा एकमेव पर्याय असतो. त्यामुळे जर्मन संघाची त्याच्यावर भिस्त असणार यात शंका नाही.