‘मुलगी नको गं बाई..!

‘मुलगी नको गं बाई..!
Published on
Updated on

चिपळूण; पुढारी वृत्तसेवा :  भारतीय परंपरेत पुरुषप्रधान संस्कृती आहे. आजही आपल्या कुटुंबाला वंशाचा दिवा हवा म्हणून अनेकांचा आटापिटा असतो. यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण खालावत चालले असून राज्यामध्ये स्त्री-पुरुष प्रमाण 929 आहे. म्हणजेच एक हजार पुरुषांमागे राज्यात 929 स्त्रिया असून महाराष्ट्र राज्य केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांच्याही स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये मागे आहे. याला कारण म्हणजे 'मुलगी नको गं बाई…!'

राज्याची 2022 च्या अंदाजानुसार 12 कोटी 49 लाख लोकसंख्या लक्षात घेतल्यास त्यातील 6 कोटी 47 लाख पुरुष तर 6 कोटी 02 लाख इतकी महिलांची संख्या आहे. या एकूण लोकसंख्येच्या आकडेवारीवरूनच स्त्री-पुरुष प्रमाण लक्षात येते. देशाच्या तुलनेत देखील महाराष्ट्र स्त्री-पुरुष प्रमाणामध्ये पिछाडीवर आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यात स्त्री भ्रूण हत्या वाढल्या असून 'मुलगी नको गं बाई' या विचारधारेमुळे दिवसेंदिवस स्त्री-पुरुषांचे गुणोत्तर ढासळत चालले आहे. राज्यात सप्टेंबर 2022 अखेर 10 हजार 372 सोनोग्राफी केंद्रांची नोंदणी झाली आहे. मात्र या कायद्याचा भंग करणार्‍याविरुद्ध तब्बल 612 प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत.

2021 मध्ये दरहजारी मुलींच्या प्रमाणात वाशिम जिल्ह्यात 101, रत्नागिरी 48 तसेच सातारा 36 व छत्रपती संभाजीनगरमध्ये 36 ने घट झाली आहे. राज्यात स्त्री भ्रूण हत्या वाढल्याने हे समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे, असे शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरूनच स्पष्ट होत आहे. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर प्रमाणात 7 ने घट झाली आहे. दरहजारी मुलींच्या प्रमाणात वर्धा व गडचिरोलीत प्रत्येकी 32 ने वाढ झाली आहे तर चंद्रपूर 25, यवतमाळ 23 ने घट झाली असून 35 जिल्ह्यांपैकी 18 जिल्ह्यात मुलींच्या संख्येत घट तर 17 जिल्ह्यात मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील बुलडाणा जिल्ह्यात लिंग गुणोत्तर प्रमाण तब्बल 865 इतके सर्वात कमी आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर प्रमाण 951 हे सर्वात जास्त आहे.

अजूनही अनेकजण जुन्या परंपरेनुसार वंशाचा दिवा हवाच यासाठी गैरमार्गाने गर्भलिंग निदान चाचणी करतात. अनेकवेळा बेवारसस्त्र जातीची बालके रस्त्यात फेकून दिल्याचे आढळून येते. अनेक नवजात अर्भकांचे मृतदेह सापडतात. या मागचे कारण शोधल्यास 'मानसिकता' हेच कारण लक्षात येते. शासनाने स्त्री भ्रूण हत्येविरोधी कायदा केला असला तरी त्यातील पळवाटा शोधल्या जातात. विवाह संस्था बिघडत चालली असून, अनेकांची लग्न उशिरापर्यंत होत नाहीत, मुली मिळत नाहीत यामुळे नवीन समस्या जन्माला येत आहे. लिंग गुणोत्तर प्रमाण ढासळत चालले असून, त्याचा भविष्यात विपरित परिणाम दिसून येणार आहे.

जिल्हानिहाय लिंग गुणोत्तर प्रमाण

सिंधुदुर्ग – 951, ठाणे- 920, पालघर – 938, रायगड – 931, रत्नागिरी – 911, पुणे – 911, हिंगोली – 902, लातूर – 904, नांदेड – 926, अकोला – 915, अमरावती – 937, यवतमाळ – 930, नागपूर – 952, वर्धा – 906, भंडारा – 942, गोंदिया – 939, चंद्रपूर – 927, गडचिरोली – 930, मुंबई – 929, नाशिक – 890, धुळे – 873, नंदूरबार – 897, जळगाव – 895, अहमदनगर – 886, सोलापूर – 892, सातारा – 885, कोल्हापूर – 868, छत्रपती संभाजीनगर – 880, जालना – 886, परभणी – 900, धाराशिव – 895, बीड – 898, वाशिम – 872, बुलडाणा – 862 अशाप्रकारे लिंग गुणोत्तर प्रमाण आहे. (दर हजारी पुरुषांमागे महिलांची संख्या.)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news