खा. श्रीकांत शिंदेंविरोधात लढणार महाविकास आघाडीकडून महिला उमेदवार ?

खा. श्रीकांत शिंदेंविरोधात लढणार महाविकास आघाडीकडून महिला उमेदवार ?
Published on
Updated on

ठाणे : दिलीप शिंदे : कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवारचा शोध सुरूच आहे. काही इच्छुकांनी माघार घेतल्याने राज्यस्तरीय आक्रमक महिला नेत्याला कल्याण लोकसभा निवडणुकीच्या निवडणूक रिंगणात उतरिवण्याची तयारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात प्रचाराची रणनीती आखली जात आहे.

संबंधित बातम्या 

कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये शिंदे गटाचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे तिसर्‍यांदा निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. त्यांची विजयी हॅट्रिक रोखण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती आखली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महाविकास आघाडी कमजोर झाली. कल्याणची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीमध्ये झाल्याने सक्षम उमेदवारांचा शोध सुरु झाला. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली. त्यांनी ही कामाला सुरुवात केली होती. कारण खासदार शिंदे आणि भोईर यांच्यातील पक्षांतर्गत वाद शिवसैनिकांना नवीन नाही. मात्र अचानक भोईर यांनी विधानसभा निवडणुकीची इच्छा व्यक्त केल्याने महाविकास आघाडीला दुसर्‍या उमेदवाराचा शोध घ्यावा लागत आहे.

दुसरीकडे कल्याण लोकसभेमध्ये मनसेचे राजू पाटील हे एकमेव आमदार आहेत. त्यांनी मागीललोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांचा मतदार संघातील वजन आणि आगरी कार्डाचा उपयोग हा शिवसेनेविरोधात उपयुक्त ठरणारा आहे. त्यामुळे राजू पाटील यांना पाठिंबा द्यावा अथवा त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार बनविण्याची तयारी सुरु झाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर आमदार राजू पाटील यांची शिंदे विरोधातील भूमिका मवाळ झाल्याचे दिसून आले. पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार होऊ शकत नाहीत, हे स्पष्ट झाल्याने खासदार शिंदे यांच्याविरोधात तगडा उमेदवार शोधण्यासाठी महाविकास आघाडीची धावपळ सुरु झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण बदलले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी खासदार शिंदे यांच्याविरोधात पुकारलेला असहकार हा फुसका बार ठरला आहे. त्यांची नाराजी कायम राहिली असती तर काट्याची लढत होईल, असे चित्र महाविकास आघाडीकडून रंगविले गेले. त्यात भर पडली ती भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या खासदारांविरोधात घेतलेल्या भूमिका. त्यातून भाजप व शिवसेना संघर्ष विकोपाला पोहचला आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी आमदार गायकवाड यांना कारागृहात जावे लागले.

त्यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघातील राजकीय वातावरण बदलले आहे. यामुळे कल्याण लोकसभा मतदार संघात उमेदवार आयात करण्यावर सहमती दर्शविण्यात आल्याचे समजते. आक्रमक वक्ता, शिवसेनेची भूमिका मांडण्यासाठी राज्यभर मेळावे घेणार्‍या महिला नेत्याला उमेदवारी देऊन मुख्यमंत्री शिंदे आणि खा. श्रीकांत शिंदे यांना कल्याण मतदारसंघात अडकवून ठेवण्याची रणनीती मविआत आखली जात असल्याचे समजते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news