एका ठराविक वयातच खांदा का सटकतो? जाणून घ्या यामागील कारण

एका ठराविक वयातच खांदा का सटकतो? जाणून घ्या यामागील कारण

खांदा हा दोन हाडांपासून बनलेला असतो. वरचा वाटीसारखा भाग पाठीच्या हाडापासून, तर खालचा गोलाकार भाग दंडाच्या हाडापासून बनलेला असतो, म्हणून या सांध्याला 'बॉल आणि सॉकेट जॉईंट' म्हणतात. वरचा वाटीसारखा भाग म्हणजे 'ग्लोनॉईड' अतिशय उथळ असतो. त्यामुळे तो बॉलला पुरेसा आधार देऊ शकत नाही. त्याला खोल करण्याकरिता ग्लोनॉईडच्या सभोवती गादीसारखे आवरण असते, ज्याला 'लॅब्रम' म्हणतात. खांदा वर-खाली, मागे-पुढे फिरवताना हे ग्लोनाईड लॅब्रम त्याला सॉकेटमध्ये पकडून ठेवते आणि बाहेर सटकू देत नाही.

अपघातामुळे किंवा खेळताना किंवा हात ओढल्या गेल्यामुळे जर ही गादी (लॅब्रम) ग्लोनॉईडपासून फाटून खाली घसरली तर बॉलचा आधार हरवून जातो. अशा वेळी खांदा दुखतो, सुजतो आणि ज्या भागातील गादी फाटली असेल त्या बाजूला सटकतो (मागे, पुढे, वर किंवा खाली) त्याला इंग्रजीमध्ये 'डिस्लोकेशन' म्हणतात. यात भूल देऊन खांद्याला जागेवर बसविले जाते आणि 2-3 आठवडे आराम आणि नंतर खांदा मजबूत करणारे व्यायाम केल्यानंतर बर्‍याचशा लोकांमध्ये खांदा पूर्ववत होतो; परंतु हे त्या व्यक्तीच्या वयावर अवलंबून असते.

काही अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, जर वयाच्या 20 वर्षांच्या आत खांदा सटकला असेल तर जवळजवळ 80-90 टक्के व्यक्तींमध्ये तो पुन्हा पुन्हा सटकण्याची शक्यता असते. 20-40 वर्षांच्या दरम्यान जर पहिल्यांदा खांदा सटकला असेल तर 40-60 टक्के व्यक्तींमध्ये आणि वयाच्या 40 नंतर पहिल्यांदा खांदा सटकला असेल, तर 20 टक्क्यांपेक्षाही कमी लोकांमध्ये तो पुन्हा सटकण्याची भीती असते. याला कारण म्हणजे विशीच्या आधी आपले सांधे खूप लवचिक असतात. अशा वेळी खांदा सटकतो तेव्हा गादीसोबत खांद्याच्या सभोवती असणारे आवरण पण रबरासारखे ताणले जाते आणि मग त्याच ताणलेल्या परिस्थितीत भरून निघते, ज्याला 'इलास्टिक डिफॉर्मेशन म्हणतात. त्यामुळे खांदा डोक्याच्या वर किंवा फेकण्याच्या स्थितीत गेल्यास पुढच्या बाजूने सटकतो. हे वारंवार होत राहिल्यास खांद्याची हाडे घासली जातात आणि त्याला खड्डा पडतो.

चाळिशीनंतर सांध्यामधील लवचिकता कमी असते, सांधे घट्ट झालेले असतात. त्यामुळे आवरणाचे इलास्टिक डिफॉर्मेशन सहसा होत नाही आणि सटकल्यावर खांद्याला पुरेसा आराम आणि व्यायाम केल्यास खांदा पुन्हा सहसा सटकत नाही. त्यामुळे खांदा जर पुन्हा-पुन्हा सटकत असेल तर त्याचा त्वरित दुर्बिणीद्वारे इलाज करून गादीला पूर्वीच्या जागेवर बसवून आणि आवरणाला पूर्वीसारखे घट्ट करून पूर्ववत करता येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news