मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने २२ मार्चपासून सक्रिय रुग्णांच्या वाढीचा आलेख उंचावला आहे. यात भरीस भर म्हणजे मे महिन्यात रुग्णसंख्या आणखी झपाट्याने वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केल्याने सक्रिय रुग्णांची संख्याही वाढून पाच ते सहा हजारांच्या घरात जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत सोमवारी १३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६९९ झाली आहे. २४ तासांत २४ जणांना विविध हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यापैकी ४ जणांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. दरम्यान दिवसभरात १ हजार ३४५ चाचण्या करण्यात आल्या. तर ९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. मुंबईत ३० जानेवारीला सक्रिय रुग्णांची संख्या आठवर होती. त्यानंतर सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली. २२ मार्चला ३६१ सक्रिय रुग्ण होते. दहा दिवसांत १ एप्रिलला ही संख्या १ हजार २१ पर्यंत पोहोचली. त्यानंतर सक्रिय रुग्णांच आलेख उंचावतच राहिला. १५ एप्रिलला १ हजार ७०२ सक्रिय रुग्ण झाले. १६ एप्रिलला २२० रुग्ण बरे झाल्याने सक्रिय रुग्णांची संख्या १ हजार ६६३ इतकी खाली आली. मात्र ही संख्या येत्या काही दिवसांत अजून वाढणार असल्याचे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने सांगितली.
वांद्रे एच-पश्चिम व फोर्ट ए विभागामध्ये रुग्णदुपटीचा दर मुंबई शहरातील अन्य भागांच्या तुलनेत जास्त आहे. आठवड्यातील रुग्ण वाढीचा दर वांद्रे येथे ०.०४२४ टक्के तर फोर्ट विभागातील दर ०.०४२३ टक्के इतका आहे. दरम्यान वांद्रे फोर्टप्रमाणे सर्व उपनगरांतील पालिकेच्या अन्य विभागांतीलही रुग्णदुपटीसह रुग्णवाढीचा दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.