फादर्स डे विशेष : आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं!

फादर्स डे विशेष : आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं!
Published on
Updated on

कोल्हापूर, सुनील कदम : 'आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं, मेरा सुना पडा रे संगीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं… 1959 साली हिंदी पडद्यावर अवतरलेल्या 'रानी रूपमती' या चित्रपटातील हे एक अजरामर प्रेमगीत. पण या प्रेमगीताचा जन्म आपल्या लेकराप्रती असलेल्या व्याकूळतेतून झाला आहे. मुळात हे प्रेमगीत नव्हे तर एका पित्याने आपल्या लेकराला घातलेली आर्त साद आहे, असे सांगितल्यास कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही; पण हे सत्य आहे. आजच्या 'फादर्स डे'निमित्त पिता-पुत्रांमधील भावबंधनावर टाकलेला हा प्रकाशझोत!

1950 च्या दशकात हिंदी चित्रपट विश्वात गीतकार पंडित भरत व्यास यांचा बराच बोलबाला होता. एकापेक्षा एक गाजलेली आणि अजरामर गीते त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला बहाल केली आहेत. याच पंडित भरत व्यास यांच्या जीवनातील हा किस्सा आहे. व्यास यांचा एकुलता एक मुलगा श्यामसुंदर व्यास हा 1957 साली रागाने आणि रुसून घरातून निघून गेला होता. पंडितजी त्यावेळी यशोशिखरावर होते. त्यांनी आपल्या मुलाच्या शोधार्थ आकाशवाणी आणि वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्या, जागोजागी त्याचे फोटो चिकटवले आणि त्याला शोधून देणार्‍यास योग्य ते बक्षीस देण्याचे जाहीर केले. वेगवेगळ्या देवादिकांना नवस-सायासही केले. पण, काही उपयोग झाला नाही.

तशातच 1958 साली एक हिंदी चित्रपट निर्माते पंडितजींच्या घरी गेले आणि त्यांना पिता-पुत्राच्या नात्यावर एक गीत लिहून देण्याची विनंती केली. पण स्वत:च पुत्रविरहात असलेल्या पंडितजींनी या निर्मात्याला घरातून हाकलूनच लावले. पण त्यांच्या पत्नीने त्यांची समजूत काढली आणि चित्रपटासाठी राहूदे, पण आपल्या मुलासाठी तरी एक गीत लिहा, म्हणून विनंती केली आणि पंडितजींच्या लेखणीतून साकारले 'जरा सामने तो आओ छलिये, यूँ छूप छूप छलने में क्या राज हैं, यूँ छूप ना सकेगा परमात्मा, मेरे आत्मा की ये आवाज हैं..!' 1958 साली 'जनम जनम के फेरे' या हिंदी चित्रपटाद्वारे हे गीत पडद्यावर आले आणि प्रचंड गाजले. पण, या गीताला पार्श्वभूमी होती ती अशी, पिता-पुत्राच्या विरहाची. त्यानंतर पंडितजींनी हिंदी चित्रपटांसाठी अनेक गाजलेली गाणी लिहिली. पण, त्यांच्या बहुतेक चित्रपटगीतांना एक प्रकारची पुत्रविरहाची झाक असलेली बघायला मिळते. अनेक गीते त्यांनी पुत्रविरहात लिहिली; पण मुलगा काही सापडला नाही की, परत आला नाही.

पुत्रविरहाच्या भावनेतूनच 1968 साली पंडितजींच्या लेखणीतून आणखी एक गीत साकारले आणि त्याचे बोल होते, 'आ लौट के आजा मेरे मीत, तुझे मेरे गीत बुलाते है, मेरा सुना पडा रे संगीत, तुझे मेरे गीत बुलाते हैं…' रानी रूपमती या हिंदी चित्रपटातील हे एक अजरामर असे प्रेमगीत आहे. पडद्यावर भारतभूषण आणि निरुपा रॉय यांनी हे गीत साकारले होते आणि गायक होते मुकेश आणि लता मंगेशकर! योगायोग असेल किंवा या गीताच्या माध्यमातून एका पित्याची आर्त साद त्यांच्या लेकरापर्यंंत पोहोचली असेल; पण हे गीत प्रसिद्ध झाल्यानंतर काही दिवसांतच पंडितजींचा रुसून गेलेला मुलगा श्यामसुंदर हा घरी परतला होता. कदाचित आपल्या पित्याच्या शब्दातील आर्त भावनेने त्याच्या हृदयाला हात घातला असावा. हे मूळ गीत जरी एक प्रेमगीत असले तरी त्याला झालर मात्र पुत्रविरहाची आहे, हे निश्चित!

पंडित भरत व्यास यांची गाजलेली गीते आणि चित्रपट!

आधा है चंद्रमा, रात आधी… (नवरंग)
जरा सामने तो आओ छलिये… (जनम जनम के फेरे)
चली राधे रानी भर अंखियों में पानी अपने… (परिणीता)
ऐ मालिक तेरे बंदे हम… (दो आंखें बारह हाथ)
ओ चांद ना इतराना… (मन की जीत)
जा तोसे नहीं बोलू, घुंघट नहीं खोलूं… (सम्राट चंद्रगुप्त)
तू छुपी है कहां, मैं तड़पता यहां… (नवरंग)
ज्योत से ज्योत जलाते चलो… (संत ज्ञानेश्वर)
कहा भी न जाए, चुप रहा भी ना जाए… (तुफान और दिया)
आ लौट के आजा मेरे गीत… (रानी रूपमती)
चाहे पास हो चाहे दूर हो… (सम्राट चंद्रगुप्त)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news