कोंभळी (पुढारी वृत्तसेवा) : नगर सोलापूर महामार्गावर मांदळी नजीक भीषण अपघात झाला असून यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर इतर दोघांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यामध्ये एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला असून यामध्ये स्विफ्ट कार व मालवाहतूक ट्रक यांचा समावेश आहे.
तालुक्यातील थेरगाव येथील चार तरुण घोगरगाव येथून चारचाकी वाहनाने गावाकडे येत असताना मांदळी नजीक हा भीषण अपघात झाला,मिरजगावच्या दिशेने जाणारी स्विफ्ट कार अहमदनगरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहतूक ट्रक च्या पुढील चाकाच्या बाजूला व रस्ता दुभाजकावर जोरदार आदळली आहे.
हा अपघात इतका भयानक होता की कार गाडीचे इंजिन बाजूला फेकले गेलेले आहे, अपघातानंतर तरुणही बाहेर फेकले गेले होते असे सांगण्यात येत आहे. या अपघातात निलकंठ माने (वय ३२ वर्ष) , शरद पिसाळ (वय ३० वर्ष) दोघे राहणार थेरगाव ता कर्जत या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून धर्मराज सकट ,सोन्या सकट हे जखमी झाले असून उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे, जखमी मधील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते, तसेच थेरगावचे सरपंच रविंद्र महारणवर, मांदळीचे उपसरपंच धनेश गांगर्डे, नागमठाण चे सरपंच देविदास महारणवर, शोभचंद शिंदे, उपसरपंच रामा शिंदे, सुधीर बचाटे, स्वप्नील शहाणे, परशुराम बावडकर, पोलीस पाटील ईश्वर जोगदंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी जखमींना तात्काळ मदत करून रुग्णालयात हलविले. मृतांना कर्जत येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी सूचना करून चालक पोलीस कॉन्स्टेबल राहुल सपाट व पोलीस पाटील बंडू बाबर यांनी वाहतूक सुरळीत केली.