आपण आठवड्यातून एखादा तरी उपवास करतो. मुळात उपवासाचा अर्थ पोटाला आराम मिळणे असा असतो. आपल्याकडे आठवड्यातील ठरलेल्या दिवशी उपवास केला जातो. काही वेळा उपवासादिवशी खूप जड पदार्थ खाल्ले जातात. जर सण, उत्सव आले की, त्याकाळातदेखील उपवास केले जातात. उपवास करावे की नाही? यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. (Fasting Advantages or disadvantages) पचनसंस्थेला काही ठराविक काळानंतर काही प्रमाणात विश्रांती मिळणे, हा देखील एक उद्देश उपवासामध्ये असतो. अध्यात्मिक दृष्टिकोनातून व्रत म्हणून केल्या जाणार्या उपवासाने मनाचे बळ वाढण्यास निश्चितच मदत होते. म्हणजेच शास्त्रीयपणे आणि प्रमाणात उपवास केल्यास आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदेशीर असते. (Fasting Advantages or disadvantages)
पूर्वी शास्त्रकारांनी सांगितलेल्या उपवासाच्या स्वरूपामध्ये बदल होत गेला. माणसाने स्वतःच्या पाककला कौशल्याने विविध पदार्थांना उपवासाचे पदार्थ म्हणून स्थान दिले. कालांतराने ही यादी वाढू लागली. मूळच्या उपवासाच्या खाण्याच्या सात्विक आहाराचे स्वरूप बदलून दिवसेंदिवस तो रज आणि तम गुण वाढविणारा होत गेला. उपवासाचे म्हणून खाल्ले जाणारे शाबुदाणा खिचडी, वरीचे तांदूळ, शेंगदाण्याची आमटी, शाबुदाणा वडा, शेंगदाण्याची उसळ, शेंगदाण्याची चटणी, रताळ्याचा कीस, बटाट्याची भाजी, वेफर्स, पापड, शिंगड्यांचे पदार्थ, राजगिरा लाडू, पॅटीस, वारंवार चहा, कॉफी, केळ्यांचे शिकरण, फ्रूट सॅलड इत्यादी पदार्थ पाहिल्यास हे सर्व पचावयास जड, स्निग्ध गुणांचे, तळलेले असलेले, हिरवी मिरची आणि डालडा यांच्या अतिवापरामुळे गुणाला अतिशय उष्ण आणि तीक्ष्ण असणारे, शरीरात लाघव (हलकेपणा) निर्माण करण्यापेक्षा गुरुत्व किंवा जडपणा उत्पन्न करणारे असतात.
बहुतांशजण उपवास म्हणत हे पदार्थ आवडीने तडस लागेपर्यंत खातात आणि 'एकादशी दुप्पट खाशी' ही म्हण सार्थ करतात असे आढळण्यात आहे. काही जणांचे एका एका आठवड्यात तीन-तीन, चार-चार उपवास असतात, तर काही जण लागोपाठ आले, त्यायला मी काय करणार, असा सवाल करीत उपवासाच्या पदार्थांवर ताव मारत पोटावर अत्याचार करीत असतात.
पित्ताचा त्रास – जळजळ, डोके दुखणे, पोट दुखणे, क्वचित उलटी होणे, तसेच काहीवेळा यातून अंधारी, चक्कर, चिडचिड होणे, अशक्तपणा इत्यादी जाणवते. उष्ण प्रकृती किंवा पित्ताची प्रकृती असणार्यांना हा त्रास विशेषत्वाने जाणवतो.
पचन बिघाड – पोट जड राहणे, गॅसेस, अस्वस्थपणा, संडास साफ न होणे, चिकट होणे आणि याच्याच परिणामी उत्साह कमी होऊन झोपून राहावेसे वाटणे, जड वाटणे या तक्रारी जाणवतात.
मूळव्याध – वरील तक्रारी जाणवत असतानादेखील उपवास करीत राहिल्यास कालांतराने संडासच्या जागी दुखणे, कोंब येणे, काहीवेळा रक्त पडणे असा मूळव्याधीचा त्रासदेखील सुरू होतो आहे, असे वाटू लागते. 'कळते, पण वळत नाही,'
स्थूलपणा किंवा वजन वाढणे –
वर सांगितल्याप्रमाणे उपवासाचे पदार्थ तेलकट आणि जड असल्यामुळे शरीरामध्ये चरबी साठू लागून वजन वाढायला लागते आणि या वाढलेल्या वजनातूनच कमी वयात अतिरक्तदाब, मधुमेह, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधीवात यासारखे आजार होऊ शकतात.
निरंकारी उपवास – काहीही न खाता-पिता वारंवार केला गेल्यास शरीराचे कुपोषण होऊन रक्ताची कमतरता, अशक्तपणा, कृशपणा आणि याच्याच परिणामी, चिडचिडेपणा, अकार्यक्षमता या तक्रारी उत्पन्न करतो.
उपवास कसा असावा –
वर्याचे तांदूळ तुपावर भाजून केलेला भात, दूध, ताजे ताक घ्यावे किंवा शाबुदाण्याची खीर घ्यावी. खिचडी करताना शेंगदाणे व मिरची यांचा वापर अतिशय कमी असावा. डालडा न वापरता नेहमीची तेल कमी प्रमाणात वापरावे आणि एक डीश एवढ्या प्रमाणात ती खावी. चालू असणार्या ऋतूतील फळांचा आहार घ्यावा. डायबेटिस, रक्तदाब अथवा स्थूलपणा असणार्यांनी वैद्याचा सल्ला घ्यावा. राजगिराचे लाडू अथवा वडी किंवा ओल्या नारळाच्या वड्या यांचा वापर करावा. या विविध पर्यायांपैकी एकच पर्याय एकावेळी वापरावा. दूध, ताजे ताक, नारळाचे पाणी, सरबत यांचाही उपयोग होतो.