कोल्हापूर, डी. बी. चव्हाण : कोल्हापूर, गडहिंग्लज आणि जयसिंगपूर या तीन बाजार समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सोमवारपासून सुरू होत आहे. ज्या शेतकर्यांच्या नावे जमीन आहे, त्यांनाही उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. त्यामुळे निवडणूक इच्छुकांची संख्या वाढणार आहे. सत्ताधार्यांनी विरोधकांची कोंडी करण्यासाठी जरी हा निर्णय घेतला असला, तरी पॅनेलची रचना करत इच्छुकांच्या संख्येने नेत्यांची दमछाक होणार आहे.
बाजार समितीसाठी यापूर्वी मतदारयादीत नाव असणार्या मतदारालाच समितीची निवडणूक लढवता येत होती. मात्र, सरकारने सात-बाराधारक शेतकर्याला बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास पात्र ठरविले आहे. मात्र, अशा उमेदवाराला मतदानाचा अधिकार नाही.
उमेदवारांची संख्या वाढणार
बाजार समित्यांसाठी शेतकर्यांना मतदानाचा अधिकार नाही; मात्र त्यांना उमेदवारीसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे नेत्यांच्या ईर्ष्येवर आणि विरोधाला विरोध म्हणून उमेदवारांची संख्या प्रचंड वाढणार, असे चित्र आहे. तसेच साखर कारखाने, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अशा इच्छुकांकडून नेत्यांचीच कोंडी करण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अडते-व्यापारी गटातील इच्छुकांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत.