कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’ला इंचही जमीन देणार नाही; महामार्गाच्या विरोधात शेतकर्‍यांचा विराट मोर्चा

कोल्हापूर : ‘शक्तिपीठ’ला इंचही जमीन देणार नाही; महामार्गाच्या विरोधात शेतकर्‍यांचा विराट मोर्चा

Published on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 'देणार नाही, देणार नाही, एक इंचही जमीन देणार नाही', 'शेतकरी वाचवा देश वाचवा'… या आणि अशा विविध घोषणा देत शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेतकर्‍यांसह महिलांची संख्या लक्षणीय होती. या प्रस्तावित महामार्गाबाबत शेतकर्‍यांच्या भावना तीव— आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या संंख्येने शेतकर्‍यांचा रोष परवडणारा नाही याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देऊन यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आंदोलकांसमोर बोलताना दिली. महामार्गास शेतकर्‍यांचा विरोध पाहता शासनाने याचा फेरविचार करावा, असे मुश्रीफ म्हणाले.

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची घोषणा झाल्यानंतर राज्यात सर्वच भागातून याला विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले. दसरा चौकातून मोर्चास सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात हातात विविध घोषणांचे फलक घेऊन आंदोलक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. आंदोलनात शेतकरी बांधव सहकुटुंब सहभागी झाल्याने मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. दसरा चौक व्हीनस कॉर्नर, असेंब्ली रोड, बसंत-बहारमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत करण्यात आले.

कोणत्याही परिस्थितीत या महामार्गास जमीन देणार नाही, आम्हाला मरण आले तरी चालेल. जमीन देणार नाही, अशा शब्दांत विविध वक्त्यांनी संताप व्यक्त केला. नागपूर-रत्नागिरी, आजरा-आंबोली, निपाणी-देवगड हे मार्ग असताना पुन्हा हा नवा महामार्ग कशासाठी, असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला. ठेकेदार आणि अधिकारी, मंत्र्यांना सांभाळण्यासाठी महामार्गाचा घाट घातल्याचा आरोप यावेळी काही वक्त्यांकडून करण्यात आला. या महामार्गाची कोणीही मागणी केलेली नाही. ज्यांनी मागणी केली त्याचे नाव जाहीर करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन अधिकच तीव— करण्याचा निर्धार केला. शेतकर्‍यांमध्ये फूट पडणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन अनेक वक्त्यांनी केले. सत्तेतील नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना हा महामार्ग रद्द करण्यास सांगावे, असे आवाहनही करण्यात आले.

आंदोलकांसमोर उदय नारकर, गिरीश फोंडे, कॉ. शिवाजी मगदूम, सुधीर पाटोळे, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, बाळासाहेब पाटील यांची भाषणे झाली. माजी आमदार के. पी. पाटील, संजय घाटगे, एम. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात अंबरीश घाटगे, दादा पाटील, योगेश कुळवमोडे, पूजा मोरे, युवराज कोईगडे, युवराज पाटील, शहाजी कपले, आनंदा पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news