खाणार्‍याला गोडवा.. पिकविणार्‍याला भोपळा..! कवडीमोल दरामुळे टरबुजावर फिरविला कोयता

खाणार्‍याला गोडवा.. पिकविणार्‍याला भोपळा..! कवडीमोल दरामुळे टरबुजावर फिरविला कोयता
Published on
Updated on

पागोरी पिंपळगाव : पुढारी वृत्तसेवा

चार ते पाच रुपये किलो दर मिळत असल्याने टरबूज उत्पादक शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पाथर्डी तालुक्यातील चितळीत शेतकर्‍यांनी, तर लागवडीच्या खर्च सुद्धा निघत नसल्याने टरबूज पिकावर कोयता फिरवला आहे. यामुळे शेतात टरबुजाचा चिखल दिसत होता.

पाथर्डी तालुक्यातील चितळी येथील शेतकरी विठ्ठल बालाजी वाघ यांच्या शेतात एक एकर क्षेत्रावर टरबुजाची लागवड केली. यासाठी सरासरी दीड लाख रुपये खर्च केला. टरबूज लागवडीनंतर शेतकर्‍यांनी तीन महिने वेळोवेळी खते, औषध फवारणी, पाणी दिले. उत्पादनही भरपूर निघत आहे; परंतु एप्रिल, मे महिन्यात बाजारात टरबुजाची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कवडीमोल दर मिळला. दोन पैसे पदरात पडतील या आशेने लावलेल्या टरबुजांवर केलेला खर्चही निघत नाही, वाहतुकीचा खर्चही निघत नाही. बाजारात तर शेतकर्‍यांवर फुकट टरबूज देण्याची वेळ आली. यामुळे हतबल शेतकरी सोनवणे यांनी टरबूज वेलींवर कोयता फिरविला.

शेतकर्‍यांच्या पदरात निराशा

शेतकर्‍यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती. मात्र, सध्या बाजारात टरबुजाच्या दरात मोठी घसरण झाली आहे. व्यापार्‍यांकडून टरबुजाला दोन ते चार रुपये प्रति किलोप्रमाणे दर मिळत आहे. यामुळे पन्नास ते साठ रुपये किमतीचे टरबूज केवळ पाच- दहा रुपयांत विक्री होत आहे. या सोबत खरबूज, काकडी आदी पिके कमी दराने विक्री होत असल्याने शेतकर्‍यांच्या पदरात निराशा आली आहे.

पुढील पेरणीच्या खर्चाचे काय?

बांधावर येऊन व्यापारी मनमानी दराने टरबूज मागत आहेत. स्वतः शेतकर्‍याने टरबूज बाजारात नेले तरीही आडतीमधील व्यापारी कमी दरात माल खरेदी करतात, अशी शेतकर्‍यांची थट्टा केली जात आहे. लागवडीचा खर्च सुद्धा निघाला नाही, आता पुढील पेरणीचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न विठ्ठल वाघ यांना पडला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news