पुढारी ऑनलाईन डेस्क : 'झलक दिखला जा' सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. (Jhalak Dikhala Ja) यंदाच्या सीझनमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माता-दिग्दर्शक फराह खान आणि अभिनेता अर्शद वारसी या शोमध्ये परीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. (Jhalak Dikhala Ja)
संबंधित बातम्या –
फराह खान म्हणते, "पुन्हा एकदा 'झलक दिखला जा' मध्ये परीक्षक म्हणून दाखल होताना मला पहिल्या सत्राची सुरुवात होताना झाला होता, तितकाच आनंद होत आहे. या शोचे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे. या आधीच्या सत्रांच्या आठवणी माझ्या मनात अजून ताज्या आहेत. हा शो डान्सचा दर्जा तर वाढवतोच, पण जे डान्सर नाहीत त्यांनाही डान्सर बनवतो. या प्रवासात सेलिब्रिटीज आपल्याला दरेक आठवड्यात आश्चर्याचा धक्का देतात. त्यामुळे हा शो मला प्रिय आहे. एक कोरिओग्राफर म्हणून मला नेहमी वाटते की, माणसाने अगदी मनापासून नाचले पाहिजे. या सत्रात विविध डान्स प्रकारांचे फ्यूजन, सहभागी सेलिब्रिटीजचे डान्सविषयीचे पॅशन आणि डान्सची परिवर्तनकारी शक्ती बघण्यास मी उत्सुकआहे. एक परीक्षक म्हणून माझी भूमिका माझ्या अनुभवाचा आणि विचारांचा उपयोग स्पर्धकांना करून देताना त्यांना प्रोत्साहन देण्याची, त्यांची नृत्य कला विकसित करण्याची आणि आपल्या कलाकारांना त्यांच्या प्रवासात मार्गदर्शन करण्याची असेल."
'झलक दिखला जा' ११ नोव्हेंबर रोजी सुरू होत आहे. दरम्यान, याच शोमध्ये अभिनेता अर्शद वारसी परीक्षकाच्या भूमिकेत टेलिव्हिजनवर पुनरागमन करत आहे. अर्शद वारसी म्हणतो, "या वर्षी 'झलक दिखला जा'च्या परीक्षकांच्या पॅनलमध्ये दाखल होताना मी अगदी रोमांचित झालो आहे. डान्स हे पहिल्यापासून माझे वेड होते आणि अनेक वर्षे या मंचावर सादर होणारे अप्रतिम परफॉर्मन्स मी आनंदाने बघितले आहेत. आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून हे आव्हान स्वीकारण्याचे धाडस करणाऱ्या आणि प्रत्येक परफॉर्मन्स अचूक व्हावा यासाठी जीव ओतून प्रयत्न करणाऱ्या स्पर्धकांविषयी मला नितांत आदर आहे. स्वतःला अशा रीतीने अभिव्यक्त करायला हिंमत लागते. मला आशा आहे की माझी टिप्पणी आणि प्रोत्साहक सल्ला त्यांना या प्रवासात आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मदतरूप ठरेल. त्यांना मनापासून डान्स करण्यासाठी आणि डान्स करताना त्याचा आनंद घेण्यासाठी प्रवृत्त करणे हेच माझे ध्येय आहे. आणि हो, त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता यामुळे माझेही मनोरंजन होईल आणि मलाही प्रेरणा मिळेल अशी मला आशा आहे. हा नवा सीझन कधी सुरू होतो, असे मला झाले आहे!"