अर्जेंटिना ‘उजव्‍या’ मार्गावर!, अध्यक्षपद निवडणुकीत मिलेईंनी मारली बाजी

व्हिअर मिलेई
व्हिअर मिलेई

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अर्जेंटिना अध्यक्षपद निवडणुकीत उजव्‍या विचारसरणीचे, पुरोगामी नेते अशी ओळख असणार्‍या जेव्हिअर मिलेई यांनी बाजी मारली आहे, असे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे. अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच मिलेई यांचे प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी आपला पराभव मान्‍य केला आहे. त्यांनी फोनवरुन मिलेई यांचे अभिनंदन केले. सध्‍या अर्जेटिना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. सर्वसामान्‍य जनता महागाईमध्‍ये होरपळत आहे. आता देशाला आर्थिक स्‍थिरतेसाठी प्रयत्‍न करण्‍याचे मोठे आव्‍हान मिलेई यांच्‍यासमोर असणार आहे. (Argentina presidential polls)

आतापर्यंत अध्‍यक्षपद निवडणूक निकालात ५५ टक्क्यांहून अधिक मते ही मिलेई यांना मिळाली आहेत. मिलेई हे पुढील चार वर्षांसाठी निवडून आलेले अध्यक्ष आहेत, असे त्‍यांचे मुख्‍य प्रतिस्पर्धी सर्जिओ मास्सा यांनी म्‍हटले आहे. वाढती महागाई, मंदीमुळे अर्थ व्‍यवस्‍थेला आलेली मरगळ आणि देशभरातील वाढते दारिद्र्य यामुळे त्रस्त अर्थव्यवस्था सुधारण्याचे आव्‍हान मिलेई यांच्‍यासमोर असेल. निवडणूक निकाल स्‍पष्‍ट होताच ब्युनोस आयर्सच्या डाउनटाउनमध्ये शेकडो मिलेई समर्थक रस्‍त्‍यावर उतरले. त्‍यांनी रॉक संगीतावर नाचत फटाके फोडत आनंदोत्‍सव साजरा केला.

मिलेई यांच्‍यासमोर अर्थव्‍यवस्‍था सुधारण्‍याचे मोठे आव्‍हान

अर्जेंटिनाच्‍या अध्‍यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्‍यानंतर मिलेई यांच्‍यासमोर मोठी आव्‍हाने आहेत. त्‍याच्‍या सरकारला मध्यवर्ती बँकेच्या तिजोरी रिकामी असताना कारभार करावा लागणार आहे. अर्जेंटिना कर्जाच्‍या विळख्‍यात आहे. मात्र देशातील तरुणाईने मिलेई यांच्‍या नेतृत्त्‍वावर विश्‍वास दाखवला आहे. देशसमोर असणार्‍या मोठ्या आर्थिक संकटावर त्‍याच्‍या नेतृत्त्‍वाखालील सरकार मात करेल, असा विश्‍वासही ते व्‍यक्‍त करत आहेत.

Argentina presidential polls : उजव्‍या विचारसरणीचे मिलेईंचा चीनला विरोध

उजव्‍या विचारसणीचे मिलेई हे स्‍वत: अर्थशास्त्राचे अभ्‍यासक आहेत. यांच्‍या विजयाचे अर्जेंटिनावर दुरगामी परिणाम होतील, असे देशातील राजकीय विश्‍लेषक मानत आहेत. लिथियम आणि हायड्रोकार्बन्सच्या व्यापारावर परिणाम होऊ शकतो. उजव्‍या विचारसणीच्‍या मिलेई यांनी चीन आणि ब्राझील सरकारच्‍या धोरणांवर टीका केली आहे. ते "कम्युनिस्ट" सरकारबरोबर कोणतेही व्‍यवहार करणार नाहीत तर अमेरिकेबरोबर ते देशाचे संबंध अधिक सदृढ करतील, असे मानले जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मिलेईचे अभिनंदन केले आणि सांगितले की मुक्त धोरण अर्जेंटिना पुन्हा एकदा एक महान देश बनवेल. तर डाव्‍या विचारणीचे डाव्या कोलंबियाचे अध्यक्ष गुस्तावो पेट्रो म्हणाले की, आज अर्जेंटिनासाठी "दुःखाचा दिवस" आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news