वॉशिंग्टन : अब्जाधीशांची संपत्ती आणि त्यांची आलिशान निवासस्थानेही सर्वसामान्यांच्या कुतुहलाचा विषय असतात. आता फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या एका 'सिक्रेट होम'चे काम सुरू आहे. ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमिनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या सार्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल; मात्र हे असेच घर 39 वर्षीय झुकेरबर्ग हवाई बेटांवरील कवौई येथे बांधत आहेत.
बॉण्डची भूमिका साकारणार्या प्रिस ब्रोसनान यांच्या घरापासून मार्कचे हे घर 10 मैलांवर आहे; मात्र या 1400 एकरांच्या बेटावर खरोखरच मार्क झुकेरबर्ग नैसर्गिक आपत्तीपासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याच्या उद्देशाने हे असे हायटेक घर बांधतोय का, याबद्दलची ठोस माहिती मिळालेली नसली तरी या ठिकाणी बांधकामास सुरुवात झाली आहे, असे एका पाश्चात्त्य दैनिकाने आपल्या वृत्तात म्हटले आहे.
मार्क झुकेरबर्ग यांना आपला खासगीपणा जपण्याची आवड आहे. त्यांनी या बेटावर जो प्रकल्प उभारण्याचा विचार केला आहे, तो उत्तर अमेरिकेतील सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये मार्क दोन बंगलेच बांधणार आहे, असे नाही तर जणू संपूर्ण गावच वसवणार आहे. कवौई हे बेट स्वर्गासारखे असल्याचे म्हटले जाते.
या बेटावर वर्षावनांबरोबरच काही धबधबेही आहेत. निसर्गसौंदर्याने हे बेट नटलेले आहे. अनेक चित्रपटांचे या बेटावर शूटिंग झालेले आहे. अशा ठिकाणी कुंपणामध्ये एक डझनहून अधिक इमारती आहेत. यात गेस्ट हाऊसही आहेत. या ठिकाणी एकूण 30 बेडरूम आणि 30 बाथरूम असणार आहेत. दोन आलिशान बंगल्यांचा एकूण एरिया हा 55,000 स्वेअर फूट म्हणजेच फुटबॉल मैदानाएवढा असेल. येथे लिफ्ट, ऑफिससाठीची जागा, कॉन्फरन्स रूम आणि इंडस्ट्रियल साईज किचन असणार आहे.
एका इमारतीत व्यायामशाळा, स्वीमिंग पूल, सोना, हॉट टब आणि टेनिस कोर्ट असणार आहे. या घराच्या आजूबाजूला 11 झाडांवर ट्री हाऊसेस असणार आहेत. ही घरे रोप ब्रिजेसने जोडलेली असतील. हे दोन्ही बंगले एका मोठ्या सुरुंगाने जोडलेले असतील. तसेच या बंगल्यांखाली जमिनीत 5000 स्वेअर फुटांचा बंकरही असेल. यातही झोपण्याची जागा, तांत्रिक गोष्टींसाठीही जागा व इतर गोष्टी असतील. घराचे मुख्य दरवाजे बंकर्ससाठी वापरण्यात येणार्या दरवाजांसारखे बांधले जातील. धातूच्या पातळ तुकड्यांमध्ये काँक्रिटचा वापर करून हे दरवाचे तयार केले जातील; मात्र येथे राहणार्या स्थानिकांना अद्याप स्वत:ची हक्काची घरे नसताना मार्क झुकेरबर्ग इथे घर बांधत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे.