एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालपट्टी

एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची अखेर हकालपट्टी

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना सहकार आयुक्तांनी जोरदार दणका दिला असून सदावर्ते यांचे निकटचे नातेवाईक असलेल्या सौरभ पाटील यांची एसटी सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकही पात्रता निकष पूर्ण न करता आल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सहकार आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. या बँकेवर सदावर्ते यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलची सत्ता आहे.

नियमानुसार व्यवस्थापकीय संचालक या जबाबदारीच्या पदावर कोणाचीही नियुक्ती करताना त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी घेणे आवश्यक असते. पाटील यांची नियुक्ती करताना अशी अनुमती न घेतल्याबद्दल सहकार खात्याने यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता थेट कारवाई करण्यात आली आहे.

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांना किमान आठ वर्षांचा अनुभव अपेक्षित असतो. याखेरीज 35 वर्षे वयाची अट आहे. पाटील यांचे वय 25 च्या आसपास आहे. त्यांच्याकडे आठ वर्षांचा अनुभवही नाही. ते कोणत्याही निकषात बसत नव्हते. हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर सहकार खात्याने अखेर कारवाईचा बडगा उगारला. सहकार आयुक्तांनी एसटी बँकेला पत्र लिहून पाटील यांना आठवडाभरात काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. याच कालावधीत नव्या संचालकांची नेमणूक करा. त्याचबरोबर अन्य सगळ्या प्रक्रिया पूर्ण करा, असेही पत्रात म्हटले आहे.

पाटील यांच्यावर झालेली कारवाई हा अ‍ॅड. सदावर्ते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. सदावर्ते यांच्या पॅनेलची एसटी बँकेवर सत्ता आहे. पाटील यांची हकालपट्टी झाल्यामुळे आता एसटी बँकेला नव्या व्यक्तीची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालकपदी करावी लागणार आहे.

सदावर्तेंनी एसटी बँकेत स्वतःच्या पत्नीचा, गोडसेचा फोटो लावला

अमरावती : गुणरत्न सदावर्ते यांना राज्य सरकारमधील कुणाचा तरी वरदहस्त असल्याचे सांगत त्यांना पाठिंबा देणार्‍यांचा मी निषेध करतो, अशा शब्दांत को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी घरचा आहेर दिला. सदावर्ते यांनी एसटी बँकेत स्वतःच्या पत्नीचा आणि नथुराम गोडसेचा फोटो लावला, अशीही टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news