पृथ्वीवर 8 अब्ज वर्षांनंतर पोहोचले स्फोटाचे संकेत!

पृथ्वीवर 8 अब्ज वर्षांनंतर पोहोचले स्फोटाचे संकेत!

वॉशिंग्टन : शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडातील रेडिओ लहरीच्या रहस्यमय स्फोटाचा शोध लावला असून, आश्चर्य म्हणजे याचे संकेत पृथ्वीवर पोहोचण्यासाठी तब्बल 8 अब्ज वर्षे लागली आहेत. याला 'फास्ट रेडिओ बस्ट एफआरबी' असे म्हटले जाते.

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, 'एफआरबी 2022610ए' नावाचा हा स्फोट एका मिली सेकंदापेक्षाही कमी अवधीचा होता. पण, यानंतरही इतक्या कमी वेळेतही इतके उत्सर्जन झाले, जे उत्सर्जन सूर्य ऊर्जेच्या माध्यमातून जितके 30 वर्षार्ंत होऊ शकते!

या संशोधनानुसार मागील वर्षी 10 जून रोजी एका रेडिओ टेलिस्कोपच्या माध्यमातून या स्फोटाचा शोध लावण्यात आला. याची जेथून सुरुवात झाली, त्या आकाशगंगेचा शोध घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी चिलीतील युरोपियन सदर्न ऑब्जर्व्हटरी आणि बड्या टेलिस्कोपचा वापर केला. ज्या रेडिओ दुर्बिणींमुळे हा शोध शक्य झाला, त्यात ऑस्ट्रेलियातील रेडिओ दुर्बिणीची मालिकाही समाविष्ट आहे. ऑस्ट्रेलियातील मॅक्वेरी विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ व संशोधनातील सहलेखक डॉ. स्टुअर्ट रायडर असे म्हणाले की, रेडिओ दुर्बिणींच्या साखळीमुळे स्फोट नेमका कुठे झाला, याचा अंदाज वर्तवणे शक्य होते.

एफआरबी रेडिओ लहरींचे चमकदार स्फोट होत असतात. त्याचा अवधी अगदी मिली सेकंदांचा असतो. एफआरबीचा शोध सर्वप्रथम 2007 मध्ये लावला गेला. त्या वेळेपासूनच संशोधक त्याचा उगम केंद्र शोधत आहेत. हे स्फोट इतके शक्तिशाली असतात की, सेकंदाच्या हजाराव्या भागात ते इतकी ऊर्जा निर्मिती करतात, जितका सूर्य एका वर्षाच्या कालावधीत करतो. अनेक एफआरबी गायब होण्यापूर्वी काही मिली सेकंदापर्यंत चमकत्या रेडिओ लहरी सोडतात. संशोधकांचा असा दावा आहे की, हा रेडिओ बर्स्ट आतापर्यंत शोधण्यात आलेल्या एफआरबीमधील सर्वात जुना व सर्वात दूरवरचा आहे.

logo
Pudhari News
pudhari.news