Navratri festival 2023 : कोल्‍हापुरात नवरात्रौत्सवाच्या उत्साहाला उधाण; उद्या सीमोल्‍लंघन

Navratri festival 2023 : कोल्‍हापुरात नवरात्रौत्सवाच्या उत्साहाला उधाण; उद्या सीमोल्‍लंघन
Published on
Updated on

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्रौत्सवातील महत्त्वाचा दिवस असणार्‍या अष्टमीला करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला राज्यासह देशभरातून भाविक दाखल झाले होते. रविवारी दिवसभरात दोन लाख 34 हजार 734 भाविकांनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेतल्याची नोंद देवस्थान समितीकडे झाली आहे. अंबाबाई मंदिराकडे येणार्‍या सर्वच मार्गांवर दिवसभर वाहतूक कोंडी झाली होती.

अंबाबाई मंदिरात पहाटेपासूनच भाविक दाखल होत होते. अष्टमीचा जागर असल्याने देवीचे दर्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून भाविक आले होते. यंदा प्रथमच शेतकरी संघामध्ये दर्शन मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. रविवारी हा दर्शन मंडप गर्दीने भरल्याने दर्शनाची रांग शिवाजी चौकापर्यंत जावून पोहोचली. दर्शन रांगेतून मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी अंदाजे अडीच तासांचा कालावधी लागत होता.

मंदिराकडे येणार्‍या रस्त्यांवर भाविकांची गर्दी

शहरात 14 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. बिंदू चौक, प्रायव्हेट हायस्कूल, गांधी मैदान, करवीर पंचायत समिती अशा पार्किंगपासून भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे मंदिराकडे पायी येत होते. सहकुटुंब तसेच अनेक गावातून आराम बसेसमधून आलेल्या महिला मोठ्या संख्येने मंदिराकडे येत होत्या. मंदिराकडे येणारे सर्वच रस्ते गर्दीने फुलून गेले.

वाहनांची कोंडी

मंदिराकडे येणार्‍या सर्व मार्गांवर वाहनांच्या रांगा लागून होत्या. शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, ताराबाई रोड अशा प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी जाणवत होती. खंडेनवमी, दसर्‍याच्या खरेदीसाठीही शहरवासीय रविवारी बाहेर पडल्याने रात्री उशिरापर्यंत शहरातील रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ होती.

बाजारपेठेत खरेदीला गर्दी

परजिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, मुंबईसह कोकण आणि कर्नाटकातून भाविकांचा यामध्ये समावेश होता. कोल्हापुरी चप्पल, चटणीसह विविध वस्तू खरेदीचा आनंद या भाविकांनी घेतला.

मंदिरात धार्मिक विधी

अष्टमीनिमित्त रविवारी सकाळी मंदिरात धार्मिक विधी करण्यात आले. करवीर निवासिनी अंबाबाईची महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा बांधण्यात आली होती. महिषासुर रेड्याचे रूप घेऊन देवीशी युद्ध करू लागला. देवीने रेड्यावर पाय देऊन, त्याच्या कंठावर शूलाने वार केला, तेव्हा तो महिषासुर स्वतःच्या मुखातून पुरुषार्थ रूपाने बाहेर पडत असताना, देवी मातेने त्याचा तलवारीने शिरच्छेद केला. मातेने महिषासुरासह अनेक राक्षसांचा संहार करून त्रैलोक्याचे रक्षण केले. अशा महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा प्रतिवर्षी अष्टमीला साकारली जाते. ही पूजा श्रीपूजक निलेश ठाणेकर, प्रसाद लाटकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.

अष्टमीचा जागर

अष्टमीनिमित्त घरोघरी तुळजाभवानीची पूजा करण्यात आली. चौक मांडून तुळजाभवानी देवीचा जागर करण्यात आला. कडाकणी, खजूरसोबत तुळजाभवानीला खारा नैवेद्य दाखविला जातो. अष्टमीसोबत सोमवारी होणार्‍या खंडेनवमीचीही लगबग सर्वत्र सुरू होती.

खंडेनवमीची पूजा

नवरात्रौत्सवातील महत्त्वाचा दिवस म्हणजे खंडेनवमी. या तिथीला शस्त्रास्त्रांची पूजा केली जाते. उद्योग आणि व्यवसायात यंत्रांची, उपकरणांची आणि वाहनांची पूजा केली जाते. झेंडूची फुले आणि आपट्याची पाने शस्त्रे, यंत्रे यांच्यावर वाहिली जातात. खंडेनवमी आणि विजयादशमी – दसरा हे अनेकदा एका दिवशी येतात. नवमी व दशमी तिथी स्वतंत्र येते, तेव्हा अशा विजयादशमीला शिळा दसरा म्हणतात. यंदा विजयादशमी स्वतंत्र तिथी असल्याने यंदाचा दसरा हा रूढीप्रमाणे शिळा दसरा आहे. बहुतांश विजयादशमीला श्रवण नक्षत्र असते. पण यावेळी घनिष्ठा नक्षत्र आलेले आहे. दसर्‍याला श्रवण नक्षत्राच्या तुलनेत घनिष्ठा नक्षत्र गौण म्हटले जाते. यावर्षी खंडेनवमीला श्रवण नक्षत्र आहे. त्यामुळे खंडेनवमीलाच शस्त्रे, यंत्रे, उपकरणे, वाहने आदींची झेंडू फुलांनी पूजा करून आपट्याची पाने वाहावीत.

– पं. वसंतराव गाडगीळ, पुणे
(शारदा ज्ञानपीठाचे प्रमुख, धर्मशास्त्राचे अधिकारी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news